पंचायत समितीचे सेालर पॅनल उडाले; घरांचीही पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST2021-06-05T04:12:07+5:302021-06-05T04:12:07+5:30

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह झालेला पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. सुरगाणा ...

Cellular panel of Panchayat Samiti blown up; The houses also collapsed | पंचायत समितीचे सेालर पॅनल उडाले; घरांचीही पडझड

पंचायत समितीचे सेालर पॅनल उडाले; घरांचीही पडझड

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह झालेला पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले, तर पंचायत समितीच्या इमारतीवर असलेले सोलर पॅनल उडून गेले. सलग चौथ्या दिवशीही झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली, तर वीज पडून दोन बैल आणि एक गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. दिंडोरीतही पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले.

सुरगाण्यात १०३४ घरांची पडझड झाली आहे, तर १०२८ घरांचे पत्रे उडाल्याने रहिवाशांचे हाल झाले. येथील पंचायत समितीच्या इमारतीवर असलेले सोलर पॅनलदेखील उडून गेले. तीन अंगणवाड्यांसह एका शाळेचे पत्रे उडाल्याने शाळेमध्ये पाणी साचले आहे. दिंडोरी तालुक्यातदेखील माळेगाव काझी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे उडाले आहेत. एका शेतकऱ्याच्या भोपळ्याची बाग पावसामुळे उद‌्ध्वस्त झाली.

सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस बरसला. या पावसामुळे शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली, तर अनेक ठिकाणी झाडे पडल्यानेदेखील नुकसान झाले. सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला असला तरी चांदवड, मालेगाव, येवला, नांदगाव, दिंडोरी या तालुक्यांमध्ये वाऱ्यासह पाऊस सुरूच होता.

Web Title: Cellular panel of Panchayat Samiti blown up; The houses also collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.