पर्वणीचे काउंटडाउन सुरू
By Admin | Updated: August 27, 2015 23:52 IST2015-08-27T23:52:01+5:302015-08-27T23:52:25+5:30
तयारी पूर्ण : नाशिकला पोलिसांचा वेढा; तीन दिवस शहर ठप्प

पर्वणीचे काउंटडाउन सुरू
नाशिक : साऱ्या जगाच्या नजरा लागून असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला आता अवघे काही तास उरले असून, या अभूतपूर्व सोहळ्याची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या पर्वणीसाठी नाशिकमध्ये लाखो भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. शहरात गुरुवारी सायंकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यास सुरुवात झाली. शुक्रवार (दि. २८) ते रविवारपर्यंत संपूर्ण नाशिक शहर जवळपास ठप्प राहणार आहे.
शनिवारी (दि. २९) नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचे प्रथम शाहीस्नान पार पडणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार सकाळपासूनच नाशिकला पोलिसांचा जणू वेढाच पडणार असून, शहराचा प्रमुख भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन ते अडीच दिवस शहरात अघोषित संचारबंदीच लागू राहणार आहे. नागरिकांनी दूध, किराणा, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंची आधीच बेगमी करून ठेवली आहे. शाळांना सुटी देण्यात आली आहे, तर शासकीय कार्यालये, बॅँका सुरू राहणार असल्याचे म्हटले जात असले, तरी कर्मचारी पोहोचू
शकत नसल्याने सर्व व्यवहार बंदच राहणार असल्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने
केले आहे.