मावळत्या वर्षाला निरोपाचा.. नववर्षाच्या स्वागताचा...शहरात जल्लोष
By Admin | Updated: January 1, 2015 01:12 IST2015-01-01T01:10:18+5:302015-01-01T01:12:02+5:30
मावळत्या वर्षाला निरोपाचा.. नववर्षाच्या स्वागताचा...शहरात जल्लोष

मावळत्या वर्षाला निरोपाचा.. नववर्षाच्या स्वागताचा...शहरात जल्लोष
!नाशिक : घड्याळात रात्री १२ वाजेचा पडलेला ठोका.. त्याचवेळी डीजेचा झालेला दणदणाट.. आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तरुणाईचा सुरू झालेला जल्लोष अशा झपाटलेल्या वातावरणात शहरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नववर्षाच्या स्वागतासाठी सायंकाळपासूनच हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाबे गर्दीने फुलून गेले होते. रस्त्या-रस्त्यांवर तरुणाईचा सायंकाळपासून सुरू झालेला जल्लोेष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दिवसेंदिवस फोफावत चाललेला चंगळवाद सण, उत्सव याशिवाय नववर्षाच्या स्वागताप्रसंगी प्रकर्षाने जाणवत होता. हॉटेलमध्ये जेवण आणि संगीत पार्टी केल्याशिवाय समारंभ साजरा होत नसल्याचा समज रूढ होत चालला आहे, त्याचीच पुनरावृत्ती यावेळी पाहावयाला मिळाली; परंतु याबरोबरच संस्कृतीप्रेमींनी अनेक ठिकाणी मद्यपान करून नववर्ष साजरे करू नका, पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करू नका यांसारखे संदेश देत जनजागृती केली, तर काही खासगी संस्थांनीही दूधवाटप करून तरुणाईला मद्यप्राशनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकीकडे तरुणाईचे बेधुंद जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवीत काही संस्थांनी रामकुंडावर गोदाकाठी दिवे प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत केले.
रात्रीच्या सुमारास कॉलेजरोड तरुणाईच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याला अनेक कुटुंबांनी प्राधान्य दिल्याने शहरातील हॉटेल्स गर्दीने हाउसफुल्ल झाल्यामुळे उत्साही तरुणाईसह काही कुटुंबांनाही वेटिंग करावी लागली. वर्षअखेरनिमित्त अनेक कुटुंबांनी पर्यटनाला पसंती दिल्याने पर्यटनस्थळेही गर्दीने फुलली होती. (प्रतिनिधी)