महात्मा फुले जयंती मिरवणूक जल्लोषात
By Admin | Updated: April 12, 2017 01:11 IST2017-04-12T01:10:39+5:302017-04-12T01:11:23+5:30
विविध ठिकाणी अभिवादन : डीजेला फाटा; आदिवासी नृत्याने वेधले लक्ष

महात्मा फुले जयंती मिरवणूक जल्लोषात
नाशिक : महात्मा फुले जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी सांस्कृतिक नृत्य हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.
बागवानपुरा येथील महात्मा फुले चौकामधून संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याला भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक वत्सला खैरे, गजानन शेलार, ज्ञानेश्वर पवार, बाजीराव तिडके आदिंनी पुष्पहार अर्पण के ले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत संत सावता माळी फाउंडेशन, दंडे हनुमान मित्रमंडळ, निर्मिक फाउंडेशनचे चित्ररथ होते. १८६८ साली सर्वप्रथम अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केल्याचा जिवंत देखावा निर्मिक फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला होता. दंडे हनुमान मंडळाने एका सजविलेल्या चित्ररथात महात्मा फुले यांचा पुतळा ठेवला होता. मिरवणूक बागवानपुरा, वाकडी बारव, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, दहीपूल, संत गाडगे महाराज पुलावरून गणेशवाडी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ रात्री पोहचली. मिरवणुकीत समाजबांधव सहभागी झाले होते. सहभागी, महिला-पुरुषांनी डोक्यावर फेटे परिधान केले होते. छत्रपती शिवरायांच्या जयंतीप्रमाणेच महात्मा फुले जयंतीच्या मिरवणुकीतही सहभागी मंडळांनी डीजेला फाटा दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरातच मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे ध्वनिप्रदूषणाला निश्चितच आळा बसण्यास मदत होत आहे. नाशिककरांनी पाडलेला हा नवीन पायंडा पर्यावरणपूरक असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)