जिल्हावासीयांचे पावसासाठी महादेवाला साकडे
By Admin | Updated: July 17, 2014 00:32 IST2014-07-16T22:45:39+5:302014-07-17T00:32:27+5:30
जिल्हावासीयांचे पावसासाठी महादेवाला साकडे

जिल्हावासीयांचे पावसासाठी महादेवाला साकडे
नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुधवारी दुपारी काही तालुक्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी अद्याप दमदार पावसाची अपेक्षा आहे. पावसासाठी जिल्ह्यात विविध भागांमध्ये महादेवाला साकडे घातले जात आहे. यासाठी शिवलिंगावर जलाभिषेक करण्याबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
मनमाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आलेला असतानाही पावसाने हजेरी न लावल्याने तोंडचे पाणी पळालेल्या महिलांनी वरुणराजाला साकडे घालण्यासाठी वागदर्डी ते नागापूर पायी दिंडीने जाऊन नागेश्वर येथील नागेश्वराला पाण्याचा अभिषेक करून पावसासाठी साकडे घातले आहे. महिंलांच्या दिंडीने ‘हर हर महादेव शंभो, काशीविश्वनाथ गंगे’च्या गजरात नागेश्वराला विनवणी केली. यावर्षी परिसरात पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जुलै महिना मध्यावर आलेला असतानाही पावसाचे आगमन न झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. मनमाड परिसरात जोरदार पाऊस पडावा व शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण परिसर, तसेच पंचक्रोशीतील ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडावा यासाठी महिलांच्या वतीने पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. असंख्य महिलांनी डोक्यावर कलश घेऊन शंभो महाराजाचा जयघोष करत मनमाडमार्गे नागापूरकडे प्रयाण केले. तब्बल सहा कि.मी. पायी निघालेल्या या दिंडीने शहरातून प्रदक्षिणा केली. नागापूर येथील महादेव मंदिरातील पिंडीस डोक्यावरून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक केला. (वार्ताहर)
रेडगाव खुर्द : पन्हाळे, ता. चांदवड येथील महिलांनी महादेव मंदिरातील पिंडीवर जलाभिषेक करून महादेवाला पावसाचे साकडे घातले. पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही अद्याप पावसाचा थेंबही पडलेला नाही. पाणीटंचाई व दुष्काळाच्या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे. साठवलेले पाणी व चारा संपल्याने तालुक्यात चारा, पाण्याची टंचाई भेडसावत आहे. सुरुवातीपासूनच पावसाने डोळे वटारल्याने रोहिणी, मृग, आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रही कोरडे गेले आहे. सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस सक्रिय झाला असताना परिसरात व तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी देवाला साकडे घातले जात आहे. पन्हाळे येथील महिलांनी हंडाभर पाणी आणून गावातील महादेव मंदिरात पिंडीवर जलाभिषेक केला. विविध स्वयंरचित भजने गाऊन महिलांनी महादेवाला पावसाचे साकडे घातले.
तसेच गावातील लक्ष्मी, हनुमान मंदिरात ग्राम देवतांना जलाभिषेक करून संभाव्य दुष्काळाच्या संकटातून मुक्त करण्याचे साकडे घातले. यावेळी सुमन आवारे, सखूबाई कुंभार्डे, संगीता आवारे, मंगल आवारे, मंदा कुंभार्डे, ठकूबाई म्हस्के, उषा आवारे, सोन्याबाई आवारे आदि महिला उपस्थित होत्या.(वार्ताहर)