लग्नाच्या पहिला वाढदिवस वृक्षारोपण करून केला साजरा
By Admin | Updated: June 10, 2015 22:21 IST2015-06-10T22:21:21+5:302015-06-10T22:21:56+5:30
अपंग तरुणाने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

लग्नाच्या पहिला वाढदिवस वृक्षारोपण करून केला साजरा
मालेगाव : वाढदिवस साजरा करण्याच्या ंअनेक प्रथा रूढ असताना, शहरालगतच्या सोयगाव येथील अपंग तरुणाने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी वृक्षारोेपण करून आगळेवेगळे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
शहरालगतच्या सोयगाव येथील पुंडलिकनगरमध्ये राहणाऱ्या संतोष बन्सीलाल पारख या दोन्ही पायाने अपंग असलेल्या तरुणाने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी तीन रोपं लावली. या तीनही रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे.
जागतिक तपमान वाढीची झळ सर्वसामान्यांना बसत असून, सर्वत्र झालेल्या बेसुमार वृक्षतोडीचे मोठे गंभीर परिणाम मानवाबरोबरच प्राणिमात्रांना सोसाावे लागत आहे. मालेगाव शहर व परिसरात दरवर्षी तपमानात वाढ होत आहे. त्यातच वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन सततच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. यामुळे जनतेत आता याविषयी जागृती करण्याची गरज निर्माण होत आहे. त्यातून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे; मात्र वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांकडे लक्ष दिले जात नसल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. परंतु अपंग असताना आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून किराणा व्यावसायिक असलेल्या संतोष यांनी तीन रोपे लावून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या कार्यात पत्नी रिना यांनीही साथ दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी शैला वाजे, प्रिया वाजे, रिता वेताळ, किरण विभुते, नरेंद्र खैरनार, विश्वनाथ पाटील, हिरालाल वेताळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)