विविध उपक्रमांसह धनत्रयोदशी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:19 IST2017-10-18T00:19:38+5:302017-10-18T00:19:43+5:30
दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशी. कुबेराचे पूजन, धनाचे, हत्यारांचे पूजन, अकाली मृत्यूपासून कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी कणकेच्या दिव्याचे प्रज्वलन, आरोग्यदेवता धन्वंतरी जयंतीनिमित्त पूजा आदींनी धनतेरस अर्थात धनत्रयोदशी मंगळवारी (दि. १७) शहरात उत्साहात साजरी झाली. व्यापारीवर्गाकडून यानिमित्त कुबेराचे पूजन करण्यात आले. व्यापारी व दुकानदारांनी सकाळी १०.४० ते रात्री ९ वाजेपर्यंत असणाºया विविध मुहूर्तांवर धन व वहीपूजन केले.

विविध उपक्रमांसह धनत्रयोदशी साजरी
नाशिक : दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशी. कुबेराचे पूजन, धनाचे, हत्यारांचे पूजन, अकाली मृत्यूपासून कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी कणकेच्या दिव्याचे प्रज्वलन, आरोग्यदेवता धन्वंतरी जयंतीनिमित्त पूजा आदींनी धनतेरस अर्थात धनत्रयोदशी मंगळवारी (दि. १७) शहरात उत्साहात साजरी झाली. व्यापारीवर्गाकडून यानिमित्त कुबेराचे पूजन करण्यात आले. व्यापारी व दुकानदारांनी सकाळी १०.४० ते रात्री ९ वाजेपर्यंत असणाºया विविध मुहूर्तांवर धन व वहीपूजन केले. धनत्रयोदशीपासून वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते म्हणून धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. नव्या वर्षाच्या हिशेबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करण्यात आले. व्यापारी, दुकानदार यांनी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे यांची पूजा केली. शेतकºयांसाठी नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असल्याने त्यांनी नवीन धान्याची पूजा करण्यावर भर दिला. यावेळी धने व गूळ यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. मृत्यू हा कुणालाच टळलेला नाही. पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये. याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावला जातो. याला यमदीपदान असे म्हटले जाते. घरोघरी या यमदीपदानाच्या परंपरेचे पालन करण्यात आले. धनत्रयोदशीनिमित्त आयुर्वेद दवाखान्यांमध्ये धन्वंतरी देवतेचे पूजन, प्रार्थना व आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांना गूळ, कडुनिंबाचा पाला, धने आदींचा आरोग्यदायी प्रसाद देण्यात आला. काही ठिकाणी दवाखान्यांमधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना स्नेहभोजन, दिवाळी भेट, मिठाई, बोनस आदींचे वाटप करण्यात आले. याशिवाय वर्षभर राबविण्यात आलेले उपक्रम, स्पर्धा यातील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. धनत्रयोदशीचा मुख्य कार्यक्रम आयएमए हॉल व पंचवटीतील आयुर्वेद महाविद्यालय येथे दुपारी पार पडला. याठिकाणी धन्वंतरी पूजन, प्रार्थना, प्रासंगिक भाषणे आदी कार्यक्रम झाले.