प्रभाग ५३ वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
By Admin | Updated: January 8, 2016 00:25 IST2016-01-08T00:08:23+5:302016-01-08T00:25:35+5:30
प्रभाग ५३ वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

प्रभाग ५३ वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
इंदिरानगर : महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी शहरातील इंदिरानगर भागातील प्रभाग ५३ हा संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या ‘वॉच’खाली आला आहे. या प्रभागातील सर्वच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने सध्या एकूण चौदा कॅमेऱ्यांची प्रभागातील हालचालींवर सूक्ष्म नजर आहे. नुकतेचे चेतनानगर परिसरातील लालबाग चौकात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर हा परिसर सुशिक्षित नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. दिवसेंदिवस या भागात शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेसची संख्यादेखील वाढीस लागत आहे. त्यामुळे इंदिरानगर भागातील सुरक्षिततेचा प्रश्नदेखील महत्त्वाचा असल्याची बाब लक्षात घेत नगरसेवक सतीश सोनवणे यांनी प्रभागाच्या सर्वच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याला सर्वाधिक मदत झाली. कारण परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांचा सुगावा लावण्यासाठी हे कॅ मेरे उपयुक्त ठरत आहेत. सोनवणे यांनी युनिक मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वप्रथम दोन वर्षांपूर्वी राजीवनगरच्या भगवती चौकामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतर चार्वाक चौक, गजानन महाराज मार्ग, सावरकर चौक ते पेठेनगर रस्ता, राणेनगर चौफुली या ठिकाणी कॅमेरे बसविले. बुधवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या औचित्यावर नागरिकांच्या मागणीनुसार चेतनानगर परिसरातील लालबाग चौकातही चार कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात
आला. यावेळी प्रतिभा चौधरी, शोभा दोंदे, वसंत चिकोडे, किशोर शिरसाठ, अनिता सोनवणे, अनिल जाचक आदि उपस्थित होते. (वार्ताहर)