लोकसहभागातून जुन्या नाशकात सीसीटीव्ही
By Admin | Updated: January 11, 2017 00:40 IST2017-01-11T00:40:07+5:302017-01-11T00:40:22+5:30
लोकसहभागातून जुन्या नाशकात सीसीटीव्ही

लोकसहभागातून जुन्या नाशकात सीसीटीव्ही
जुने नाशिक : काझीगढी, कुंभारवाडा येथील नागरिकांनी लोकवर्गणी काढून स्वखर्चाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गुरुइच्छा मित्रमंडळ आणि परिसरातील नागरिकांनी हा उपक्रम राबविला. समाजातील काही समाजकंटक गाड्यांची तोडफोड करणे, जाळपोळ करणे, चोरी, महिलांची छेडछाड, भांडणे, हाणामाऱ्या या कोणाचीही पर्वा न करता करीत असतात. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्यात याचे सर्व चित्रण रेकॉर्ड होत असल्याने शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आल्याने पोलिसांना तपासकार्यात मोठी मदत होत आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे परिसरातील नागरिक शांततेने आणि भीती न बाळगता आता निर्भयपणे राहू शकतात. यामुळे सामाजिक सुरक्षितता निर्माण होऊन गुन्हेगारीला आळा बसेल. त्याकरिता परिसरातील नागरिकांनी श्री गुरुइच्छा मित्रमंडळाचा आदर्श घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आमदार फरांदे यांनी केले. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे शरद अहेर होते. त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष अरुण नेवासकर, नगरसेवक विनायक पांडे, नगरसेवक वत्सला खैरे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, रमाकांत क्षीरसागर, बबलू खैरे, किरण क्षीरसागर, राधेश्याम गायकवाड, ऋषीकेश चौधरी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक गुरुइच्छा मित्रमंडळाचे संस्थापक अरविंद क्षीरसागर यांनी केले, तर आभार मोहन गायकवाड यांनी मानले.