मनपा नगररचना विभागावर सीसीटीव्हीची नजर

By Admin | Updated: May 7, 2016 00:35 IST2016-05-06T22:46:29+5:302016-05-07T00:35:04+5:30

महापालिका : संशयास्पद हालचाली टिपणार

CCTV eye on Municipal Corporation Department | मनपा नगररचना विभागावर सीसीटीव्हीची नजर

मनपा नगररचना विभागावर सीसीटीव्हीची नजर

नाशिक : महापालिकेतील नगररचना विभागातील संशयास्पद कारभाराबद्दल सभागृह आणि बाहेरही नेहमीच चर्चा होत आलेली आहे. त्यामुळेच आता नगररचना विभागातील प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, संशयास्पद हालचाली टिपल्या जाणार आहेत. विद्युत विभागाने सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेतील नगररचना विभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे. नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी अर्ज करण्यापासून ते इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करेपर्यंत मोठ्या अग्निदिव्यातून सामोरे जावे लागते. याशिवाय नगररचना विभागातील अर्थकारणाबद्दलही सभागृहात सदस्यांनी आरोप केलेले आहेत. मागील वर्षी नगररचना विभागात सादर झालेली फाईल विकासकाला दिल्याने एका अभियंत्याला निलंबनाला सामोरे जावे लागले होते. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीच त्यावेळी सदर बाब निदर्शनास आल्यानंतर तडकाफडकी निर्णय घेत शाखा अभियंत्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. नगररचना विभागातील अनेक फाईली विकासक आणि वास्तुविशारदांकडे सादर केल्यानंतर आवक रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते. त्यामुळे सदर फाईल महापालिकेच्या मालकीची होऊन जाते, असे असतानादेखील अनेक फाईली काही दलाल आणि विकासक किंवा वास्तुविशारदांमार्फत वेगवेगळ्या अभियंत्यांकडे नेली जातेच शिवाय कित्येकदा पाय फुटलेली फाईल पुन्हा महापालिकेच्या बाहेरही जाते. नगररचना विभागातील फाईली अशा प्रकारे परस्पर बाहेर जात असल्याने वेळोवेळी आयुक्तांनी तंबी दिली आहे; परंतु त्याचा उपयोग होत नसल्यानेच आयुक्तांना अभियंत्याच्या निलंबनाची कारवाई करावी लागली होती. आयुक्तांनी नगररचना विभागाकडे अधिक लक्ष घातले असून विभागात वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांच्या बदल्या करत दणका दिला आहे. आता नगररचना विभागातील कारभारावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यासाठी विद्युत विभागाने सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा काढल्या असून, येत्या काही दिवसांतच कॅमेरा बसविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CCTV eye on Municipal Corporation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.