मनपा शाळांमध्ये बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Updated: March 26, 2015 22:48 IST2015-03-26T22:48:11+5:302015-03-26T22:48:22+5:30
नगरसेवक निधी आता २० लक्ष रुपये

मनपा शाळांमध्ये बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
मालेगाव : येथील महानगर-पालिकेच्या अंदाजपत्रक विशेष महासभेत स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी यांनी ३५३ कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर येत्या सोमवारपर्यंत ही महासभा तहकूब करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम होते.
मनपा प्रशासनाने स्थायी समितीपुढे यंदाचे ३३० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होेते. त्यात स्थायीने साधारण २३ कोटी रुपयांची वाढ सुचवत ३५३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. यासंदर्भातील माहिती स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी यांनी दिली. त्यात मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व या शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मनपा शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा अन्सारी यांनी केली.
शहरातील विविध आरक्षित अकरा जागा, हजारखोली प्रसूतिगृह, बागे मेहमूद, नजमाबाद जलवाहिनी, पवारवाडी पोलीस ठाणे परिसरात रस्ते व गटारीसाठी स्थायी समितीने विशेष तरतूद केली आहे. तसेच मनपा प्रशासनाने नगरसेवकांना आपापल्या वॉर्ड विकासकामासाठी केलेली प्रत्येकी चार लाखाची तरतूद स्थायीने थेट प्रत्येकी २० लक्ष रुपयांपर्यंत वाढविली असल्याचे स्थायी सभापती अन्सारी यांनी सांगितले. नगरसेवक मदन गायकवाड यांनी हद्दवाढ भागासाठी वाढीव निधीची तर नगरसेवक रफीक अहमद यांनी सर्व्हे क्र. २११ मधील कामांचा समावेश करण्याची मागणी केली.
सत्तारूढ तिसरा महाजचे ज्येष्ठ नगरसेवक एजाज उमर यांनी स्थायीने सादर केलेल्या या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून येत्या सोमवारपर्यंत सदर अंदाजपत्रकीय महासभा तहकूब करण्याची सूचना मांडली. ती मंजूर करण्यात आली. (प्रतिनिधी)