खतप्रकल्पावर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Updated: September 13, 2016 01:23 IST2016-09-13T01:23:28+5:302016-09-13T01:23:48+5:30
महासभेवर प्रस्ताव : गैरप्रकारांना बसणार आळा

खतप्रकल्पावर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने उभारलेल्या खतप्रकल्पावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंबंधीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासंबंधी १० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव येत्या सोमवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कचऱ्यामध्ये दगड-विटा नेण्यास रोखण्यापासून ते प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत मोठा उपयोग होणार आहे.
महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत खतप्रकल्पावर प्रतिदिन सरासरी ४०० टन कचरा नेला जात असतो. ठेकेदारांना कचऱ्याच्या वजनावर रक्कम अदा केली जात असते. परंतु, काही घंटागाड्यांमध्ये कचऱ्याचे वजन जास्त दिसावे यासाठी दगड-विटांचा वापर केला जात असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. वजन वाढविण्याच्या या गैरप्रकाराला रोख लावण्यासंबंधीही महासभांमध्ये वारंवार चर्चा होत आलेली आहे.
याशिवाय, खतप्रकल्पावर दोन महिन्यांपूर्वी कचरा वेचणाऱ्या मायलेकींचा कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला होता. त्यावेळी खतप्रकल्पाच्या सुरक्षितेतचाही विषय चर्चिला गेला. सदर कचरावेचक महिला नेमक्या कुठून गेल्या याबाबत ऊहापोह होऊन खतप्रकल्पावर सुरक्षा रक्षक नेमण्याचाही मुद्दा समोर आला होता. दरम्यान, घंटागाडीच्या नवीन ठेक्याला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, लवकरच प्रशासनामार्फत संबंधितांना कार्यादेश काढले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खतप्रकल्पावर प्रशासनाची नजर राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे १० लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव येत्या महासभेवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)