कळवण येथील कोसवन बारीची दुरवस्था
By Admin | Updated: January 3, 2017 23:09 IST2017-01-03T23:08:55+5:302017-01-03T23:09:20+5:30
कळवण येथील कोसवन बारीची दुरवस्था

कळवण येथील कोसवन बारीची दुरवस्था
कळवण : आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागातील गावे एकमेकांना जोडली जावी, यात वेळ आणि पैशांची बचत व्हावी म्हणून माजी मंत्री ए. टी. पवार यांनी तालुक्यात डोंगर फोडून आदिवासी भागात रस्ते तयार केले. रस्ते जोडणाऱ्या प्रमुख बाऱ्यांपैकी कोसवन बारी एक महत्त्वपूर्ण असून, तिची आज दुरवस्था झाली आहे. बारीतील रस्त्याच्या आर्ध्यापेक्षा जास्त भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने ठेकेदाराचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा बारी रस्ता. हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा ठरल्याने बारीतील रस्त्या त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांच्या परिसरातील आदिवासी जनतेने केली आहे. बरडपाडा, लखानी, कोसवन, डोंगरी जयदर, जयदर, सुळे आदिंसह परिसरातील गावांतील शेतमाल कोसवन बारीमार्गे गुजरात राज्यात विक्रीसाठी नेला जातो. मात्र या रस्त्याचे केलेले निकृष्ट काम या पावसाळ्यात दिसून आले. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याकडेला चारी वा गटार न केल्याने सदरचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सदर रस्ता मालवाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना मोठा फटका बसला आहे. आपला शेतमाल जयदर फाटा ते दळवट मार्गे विक्र ीसाठी न्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे कळवण सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासींची अडचण ओळखून तत्काळ हा बारी रस्ता दुरुस्त करावा व पुढील पावसाळ्यात अशा प्रकारचे रस्त्याचे नुकसान होऊन आदिवासींची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी पंचायत समिती माजी सभापती मधुकर जाधवांसह आदिवासी बांधवांनी केली आहे. (वार्ताहर)