केशरी कार्डधारकांनाही मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ
By Admin | Updated: November 15, 2016 02:21 IST2016-11-15T02:21:46+5:302016-11-15T02:21:07+5:30
शासनाचा निर्णय : २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित

केशरी कार्डधारकांनाही मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ
नाशिक : अन्नसुरक्षेचा लाभ देताना भेदभाव झाल्याचा सार्वत्रिक होणारा आरोप पाहता केंद्र सरकारने अत्यल्प उत्पन्न गट असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून, अंत्योदय योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित करून डिसेंबरपासून प्रत्यक्ष स्वस्त दरात धान्याचे वाटप केले जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयाने नाशिक शहरातील एक लाख २१ हजार नागरिकांना नव्याने अन्नसुरक्षा योजनेत सामावून घेतले जाणार असून, अंत्योदय योजनेतही सुमारे दोन हजार नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यात ग्रामीण भागातील ४६ टक्के तर शहरी भागातील २८ टक्के जनतेचा अधिकाधिक समावेश करण्यात आला. मात्र यातील लाभार्थी ठरविताना वार्षिक उत्पन्न जरी विचारात घेतले गेले असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणावर भेदभाव झाला होता. एकाच ठिकाणी व सारखेच उत्पन्न असतानाही एकाला या योजनेचा लाभ मिळाला व दुसऱ्याला डावलण्यात आल्याने यासंदर्भात नेहमीच तक्रारी केल्या जात होत्या. राजकीय पक्ष, झोपडपट्टीवासीयांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
या सर्व गोष्टींची दखल घेत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देणाऱ्यांच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न ५९ हजाराच्या आत असलेल्या कुटुंबीयांना त्यात सामावून घेण्यात येणार असून, अंत्योदय योजनेतही अधिक कुटुंबाना संधी मिळणार आहे. सध्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यात सहभागी करून घेतले जाईल.
शासनाने यासाठी मुदत निश्चित केली असून, २५ नोव्हेंबरपर्यंत लाभेच्छुक निश्चित केले जातील. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून याद्या मागविण्यात आल्या आहेत. त्या याद्या तपासून नंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील व अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी शहरातील रेशन दुकानदारांची शनिवारी धान्य वितरण अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लाभेच्छुकांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)