खंडित वीज पुरवठ्यामुळे नगदी पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:41+5:302021-09-19T04:15:41+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागातील भुसे, म्हाळसाकोरे, चापडगाव, करंजगाव, मांजरगाव या गावातील थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीकडून शेतातील ...

खंडित वीज पुरवठ्यामुळे नगदी पिके धोक्यात
सायखेडा : गोदाकाठ भागातील भुसे, म्हाळसाकोरे, चापडगाव, करंजगाव, मांजरगाव या गावातील थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीकडून शेतातील डीपीवरील वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेल्या नगदी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी शेतकरी करत आहे. वीज वितरण कंपनीचे अनेक शेतकऱ्यांकडे मागील काही महिन्यापासून बिल थकीत आहे तर काही शेतकरी नियमित वीज बिल भरत असतात. नगदी पिकांना कोणत्याही प्रकारचा भाव नसल्याने शेती तोट्यात गेली आहे. आशादायी असणारे टमाटे, कोबी, फ्लावर, मिरची, कोथिंबीर, शेपू हे नगदी पिके कवडीमोल भावाने विकावी लागली शेतकऱ्यांचा आपला खर्चसुद्धा वसूल करता आला नाही. पीक उभे करण्यात घातलेले भांडवल निघाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात आज एकही रुपया नाही. अशा परिस्थितीत वीज बिल कसे भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी आपले वीज बिल भरले आहे पण इतर शेतकऱ्यांनी भरलेले नाही त्यांच्या जोडण्या कट करताना संपूर्ण डीपीवरील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ज्यांचे बिल भरले ते आणि इतर सर्वजण वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्यामुळे हा अन्याय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शेती मालाचे गडगडले बाजार भाव आणि निफाड तालुक्यात झालेला जेमतेम पाऊस याचा विचार करून वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
------------------
नगदी पिकांना बाजार समित्यांमध्ये कमी दर मिळत आहे. शिवाय पाऊस जेमतेम झाला आहे. सोयाबीन, मका यांना पाण्याची गरज आहे. पण वीज वितरण कंपनी मात्र सरसकट डीपीवरील वीज पुरवठा खंडित करत आहे. शेतात वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा.
- दत्तू भुसारे, शेतकरी, भुसे