अपूर्ण पाणीपुरवठा योजनांप्रकरणी गुन्हे दाखल होणार
By Admin | Updated: November 30, 2014 01:05 IST2014-11-30T01:02:37+5:302014-11-30T01:05:44+5:30
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुका आढावा बैठक

अपूर्ण पाणीपुरवठा योजनांप्रकरणी गुन्हे दाखल होणार
नाशिक : इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील २००४ सालापासून मंजूर असलेल्या मात्र अपूर्णावस्थेतअसलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. आमदार निर्मला गावित यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत आमदार गावितांनी याबाबत बनकर यांचे लक्ष वेधले होते. रावसाहेब थोरात सभागृहात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार निर्मला गावित यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच संबंधित गावच्या ग्रामस्थ व सदस्यांची बैठक शनिवारी बोलविली होती. सन-२००४ पासून इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुमारे साडेबारा कोटी रुपयांच्या ३७ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या असून, त्यांना निधीही प्राप्त झाला होता; परंतु प्रत्यक्षात दोनच पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. ३५ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. झालेल्या कामांवर दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अपूर्ण पाणीपुरवठा योजनांना जबाबदार असलेल्या संबंधित पाणीपुरवठा समितीचे सचिव व अध्यक्ष तसेच कर्मचारी व अधिकारी वर्ग यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार निर्मला गावित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे केली. त्यावर बनकर यांनी जेथे अनियमितता झाली असेल तेथे तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना दिले. बैठकीस जि.प.सदस्य संपतराव सकाळे, पंचायत समिती उपसभापती शांताराम मुळाणे, सदस्य मंगळू भांबेरे, प्रा. घोडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)