कट मारल्याची कुरापत काढून घातला वाद, पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 5, 2016 21:33 IST2016-07-05T21:33:17+5:302016-07-05T21:33:17+5:30

पेठरोडवरील उज्जीवन फायनान्स कंपनीकडे जमा झालेली दिवसभरातील रक्कम लॉकर्समध्ये जमा करणाऱ्यासाठी वाहनातून जात असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यास बंदूक लावून

A case has been filed against Panchavati police for taking action against the accused | कट मारल्याची कुरापत काढून घातला वाद, पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

कट मारल्याची कुरापत काढून घातला वाद, पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

ऑनलाइन लोकमत
नाशिक : पेठरोडवरील उज्जीवन फायनान्स कंपनीकडे जमा झालेली दिवसभरातील रक्कम लॉकर्समध्ये जमा करणाऱ्यासाठी वाहनातून जात असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यास बंदूक लावून वाहनातील सुमारे अकरा लाख रुपये लूटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़५) सायंकाळच्या सुमारास रामवाडीतील कोशिरे मळा रस्त्यावर घडली़ विशेष म्हणजे या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करूनही चोरटे हाती लागले नाहीत़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील सिताराम चेंबर्समध्ये उज्जीवन फायनान्स कंपनीचे कार्यालय असून तेथे योगेश तांबे हे जमा झालेली रक्कम लॉकरमध्ये ठेवण्याचे काम करतात़ मंगळवारी दिवसभर कार्यालयात जमा झालेली १० लाख ८६ हजार रुपयांची रक्कम जमा करून ती वसंत मार्केटमधील कविता लॉकर्समध्ये जमा करण्यासाठी कर्मचारी तांबे हे सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास व्हॅनमधून (एमएच १५, ईएक्स ५४१७) जात होते़
रामवाडी येथील कोशिरे मळा परिसरातील रस्त्याने जात असताना तांबे यांच्या व्हॅनला नंबरप्लेट नसलेली स्प्लेंडर व सीबीझेड या दुचाकीवरील चौघांनी अडविले़ या चौघांनी खाली उतरून तांबे यांना दुचाकीला कट का मारला अशी कुरापत काढून वाद घातला़ तर काही समजण्याच्या आतच एका संशयिताने तांबे यांच्या कानशिलास बंदूक लावून व्हॅनमधील रोकड घेऊन चोपडा लॉन्सच्या दिशेने पळ काढला़ या लुटीची माहिती तांबे यांनी पोलिसांना देताच पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर हे घटनास्थळी दाखल झाले़
पोलीस अधिकाऱ्यांनी उज्जीवन फायनान्स कंपनीतील सीसीटीव्हीची पाहणी केली असून यामध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही़ या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंद करून शोध घेण्याचाही प्रयत्न केला मात्र यश आले नाही़ दरम्यान पंचवटी पोलिसांनी निमाणी व म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतून तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त केली असली तरी काही तासातच हा गुन्हा घडल्याने चोरट्यांनी आव्हान दिल्याचे दिसून येते़ (प्रतिनिधी)

 

Web Title: A case has been filed against Panchavati police for taking action against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.