चोरी गेलेला ट्रक मुद्देमालासह हस्तगत
By Admin | Updated: October 27, 2015 23:39 IST2015-10-27T23:37:51+5:302015-10-27T23:39:44+5:30
चोरी गेलेला ट्रक मुद्देमालासह हस्तगत

चोरी गेलेला ट्रक मुद्देमालासह हस्तगत
घोटी : मुंबईहून सिन्नरकडे भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकावर लुटारूंनी चाकूचा प्राणघातक हल्ला करून त्याच्या ताब्यातील सहा लाख रु पयाच्या ट्रकसह सुमारे एक लाख रुपयाच्या मालाची चोरी केल्याची घटना शनिवारी घोटीजवळ घडल्यानंतर घोटी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित चोरी गेलेला ट्रक व त्यातील मुद्देमाल शोधण्यात यश मिळविले आहे.
हा ट्रक औरंगाबादजवळ वैजापूर परिसरात बेवारसरीत्या मिळून आला आहे. मानखुर्द मुंबई येथील एका भंगार दुकानातून सात टन भंगार घेऊन सिन्नरकडे जाणारा आयशर ट्रक (क्र. एमएच ०४, एफयू ८५०७) शनिवारी पहाटे सव्वाचार वाजता घोटीजवळून जात असताना चालक अली अहमद जुम्मन हुसेन न्हाई (३०) यास दोघा अज्ञात लुटारूंनी फायदा घेत ट्रकमध्ये क्लीनरच्या बाजूने प्रवेश केला. ट्रकचा व चोरट्याचा छडा लावण्याचे गंभीर आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. याबाबत घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह उपनिरीक्षक गणेश शेळके, कमलेश बच्छाव, एकनाथ ठाकूर आदिंनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित ट्रक व मुद्देमाल मिळविण्यात यश मिळविले. हा ट्रक नादुरुस्त झाल्याने वैजापूरजवळ रस्त्यावर उभा करून चोरटे फरार झाले. हा ट्रक वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.(वार्ताहर)