वाहन अडवून लुटल्याचा बनाव उघड

By Admin | Updated: December 6, 2015 22:43 IST2015-12-06T22:43:25+5:302015-12-06T22:43:52+5:30

नांदगाव : चालकासह साथीदारास जेलची हवा

Capture the vehicle by looting | वाहन अडवून लुटल्याचा बनाव उघड

वाहन अडवून लुटल्याचा बनाव उघड

नांदगाव : मालाची विक्री करून परतत असताना अज्ञात चोरट्यांनी वाहन अडवून लुटल्याचा बनाव करून मालकाची घबराट उडविणाऱ्या चालकाची चलाखी चाणाक्ष पोलिसांच्या नजरेतून सुटली नसल्याने अखेर बनाव रचणाऱ्या चालकाला त्याच्या साथीदारासह जेलची हवा खाण्याची वेळ आली.
गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मनमाडहून हिसवळ गावाजवळ येताना अज्ञात चोरट्यांनी वाहन अडवून लुटल्याचा दूरध्वनी चालकाने केल्यानंतर मालक हादरला रात्रंदिवस वाहतुकीची वर्दळ असलेल्या नांदगाव- मनमाड रस्त्यावरच्या लूटमारीच्या घटनेने पोलीसदेखील हादरले. त्यांनी लगेचच नाकाबंदी केली. लूटमारीच्या या कथित घटनेत वाहन चालविणारा चालक जखमी होण्याऐवजी त्याचा क्लीनर जखमी झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व त्यांच्या सहकाऱ्यांना घटना तपासत असताना यात काहीतरी बनाव असल्याचे जाणवत होते. त्यांनी वाहनचालक व क्लिनर यांना विचारपूस करायला सुरु वात केली. जखमी क्लीनरला विश्वासात घेतल्याने खरी हकीगत समोर आली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर क्लीनरने सांगितले की, चालकानेच हा बनाव करीत आपल्या मित्रांना बोलावून हे दरोडानाट्य घडवले होते.
चालक थोरात याने आपल्या येवला येथील दोन साथीदारांना हिसवळ म्हसोबा बारी येथे आपल्याला दरोडानाट्य घडवायचे आहे असे सांगितले. ठरल्यानुसार मग मनमाडपासूनच ते दोघे या वाहनाच्या मागावर होते. हिसवळ बारी येथे आल्यावर गाडी थांबवून चालकाने मोटारसायकलवर आलेल्या त्या दोघांकडे पैशाची पिशवी देऊन टाकली. पैसे तर गेले पण मालकाला काय सांगायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. मग काही पैसे देण्याचे कबूल केलेल्या वाहकाने आपले डोके फोडून घेतले, तर चालकाने गाडीची समोरची काच फोडून खरोखरच गाडी अडवून पैसे लुटल्याचे वातावरण तयार करून ठेवल्याचे पोलीस तपासात वाहकाने सांगितल्यावर घटनेचा उलगडा झाला. त्यानुसार येवला येथील इतर दोघांना पोलिसांनी शोध घेऊन मुद्देमालासह ताब्यात घेतल्यानंतर या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली.(वार्ताहर)

Web Title: Capture the vehicle by looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.