उमेदवार झाले आकडेमोडीत दंग

By Admin | Updated: February 22, 2017 01:09 IST2017-02-22T01:09:19+5:302017-02-22T01:09:35+5:30

छातीठोक दावा : कहीं खुशी, कहीं गम

Candidates got stunned by the calculation | उमेदवार झाले आकडेमोडीत दंग

उमेदवार झाले आकडेमोडीत दंग

नाशिक : महापालिका निवडणुकीचे मतदान संपुष्टात येताच, उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानाच्या आकडेमोडीत दंग झाले असून, प्रभागातील कोणत्या मतदान केंद्रावर किती मतदान झाले व त्यातील किती मतदान अनुकूल, प्रतिकूल होते यावरच राजकीय भविष्याची गणिते मांडण्यात आली. मतदानाच्या आकडेवारीमुळे सर्वच प्रभागांत ‘कहीं खुशी, कहीं गम’चे चित्र पहावयास मिळाले.  गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आली. तत्पूर्वी निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच उमेदवारांनी प्रभागाची रचना, मतदार यादीचा अभ्यास करून त्यादृष्टीने प्रचाराची रूपरेषा व नियोजन ठरविले होते. प्रभागातील कोणत्या भागात व पट्ट्यातून किती मते मिळतील, नातेवाईक, हितचिंतकांची मते किती याचा सारा अभ्यास उमेदवारांनी केला होता. त्या अभ्यासानुसारच मंगळवारी उमेदवारांनी मतदानाच्या दिवशी व्यूहरचना केली होती. मतदारांची ने-आण करण्याबरोबरच, हक्काच्या मतदारांना मतदानाचे प्रोत्साहन देण्याबरोबरच, ज्या ठिकाणी कमी आशा आहे अशा ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना
आपलेसे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान प्रतिनिधी, बुथ प्रतिनिधींकडून वेळोवेळी मतदानाची माहिती घेत, त्यादृष्टीनेही उमेदवारांनी अखेरच्या क्षणापर्यंत मतदान वाढीसाठी धडपड केली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपुष्टात आल्यावर पुन्हा प्रभागाची संपूर्ण मतदार यादीचा अभ्यास करून कोणत्या भागातून किती मतदान झाले याची आकडेवारी गोळा करून आपल्या बाजूने किती मतदान अपेक्षित होते व त्यापैकी किती मिळेल याचा ठोकताळा मांडण्यात आला. अर्थात हे करीत असताना प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्याही जमा-वजाबाकीचा हिशेब करण्यात आला. (प्रतिनिधी)
राजकीय फैसला होणार
आकडेवारीतच विजयाचे गणित अवलंबून असल्यामुळे काही उमेदवारांनी मतदान आटोपल्यानंतर थेट विजयाचा दावा करीत, आनंदोत्सव साजरा केला तर काहींना आपले भवितव्य काठावर असल्याची जाणीव झाली. मतदाराच्या मनाचा ठाव अखेरपर्यंत लागत नसला तरी, काही प्रभागांत शेवटच्या दोन तासात मतदान केंद्रांवर झालेल्या गर्दीवरून काहींचा काळजाचा ठोका चुकला. सकाळपासून तुरळक गर्दी असलेल्या मतदान केंद्रांवर दुपारनंतर झालेली गर्दी साहजिकच पैशांच्या वाटपामुळे झाल्याने त्यात कोणी बाजी मारली त्यावर विजयाचा आडाखे बांधण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला चोवीस तास बाकी असून, त्यानंतर उमेदवारांचा राजकीय फैसला होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून काहींनी बांधलेले ठोकताळे खरे ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काहींनी त्यादृष्टीने निकालानंतरची तयारीही उमेदवारांनी चालविली आहे.

Web Title: Candidates got stunned by the calculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.