अवघ्या एका मताने उमेदवार विजयी
By Admin | Updated: February 25, 2017 01:05 IST2017-02-25T01:04:41+5:302017-02-25T01:05:01+5:30
अवघ्या एका मताने उमेदवार विजयी

अवघ्या एका मताने उमेदवार विजयी
सातपूर : महानगरपालिकेच्या निवणुकीत मतमोजणीच्या दिवशी प्रभाग क्र मांक १० मधील एका उमेदवाराची धडधड वाढविणारा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. टपाली मते बाजूला ठेवली तर अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या एका मताची काय किंमत असते. ते मतमोजणीनंतरच कळते. सातपूर प्रभाग क्र मांक १० मधील भाजपाच्या उमेदवार पल्लवी पाटील यांना दुसऱ्या फेरीअखेर तीन हजार १३३ मते मिळालीत, तर प्रतिस्पर्धी मनसेच्या उमेदवार कलावती सांगळे यांना ३४३६ मते मिळालीत. तिसऱ्या फेरीत पाटील यांना ९१७, तर सांगळे यांना ६१३ मते मिळाल्याने पाटील यांनी अवघ्या एका मताची आघाडी घेतली. तोपर्यंत दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चलबिचल आणि धडधड सुरू झाली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी टपाली मतांची घोषणा केली. पाटील यांना १५, तर सांगळे यांना ५ टपाली मते मिळालीत. पाटील यांना एकूण ४ हजार ६५ मते, तर सांगळे यांना ४ हजार ५४ मते मिळाली. पल्लवी पाटील यांनी ११ मतांची आघाडी घेतली आणि विजयाचे चित्र स्पष्ट झाले. निकाल घोषित झाल्यानंतरदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार हरकत घेतात की काय? असा प्रश्न पल्लवी पाटील यांच्या समर्थकांना पडला होता. त्यामुळे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी बराच उशीर झाला होता. (वार्ताहर)
हरकत घेण्याचा प्रयत्न
टपाली मते धरून ११ मतांनी पराभूत झालेल्या मनसेच्या उमेदवार कलावती सांगळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली व टपाली मतांवर हरकत घेण्याचा प्रयत्न केला. टपाली मते नेमकी कोणाची आहेत याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागितली. परंतु गोपनीयतेचा भंग होईल म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. तरीही हरकत घ्यायची असेल तर तसा अर्ज दाखल करा किंवा न्यायालयात दाद मागू शकतात, असा सल्ला निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी दिला. परंतु सांगळे हे या सल्ल्याकडे डोळेझाक करीत माघारी फिरले.