उमेदवार लादणार नाही
By Admin | Updated: August 25, 2016 00:51 IST2016-08-25T00:50:42+5:302016-08-25T00:51:31+5:30
भाई जगताप : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आढावा बैठक

उमेदवार लादणार नाही
नाशिक : येत्या जानेवारी-फेबु्रवारी २०१७मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवूनच उमेदवारी दिली जाईल. कोणताही उमेदवार स्थानिकांवर लादला जाणार नाही, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आमदार भाई जगताप यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या आढावा बैठकीत आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कॉँग्रेस भवनात आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, निवृत्ती डावरे, श्याम तायडे, भाऊसाहेब बोरस्ते, सुनील आव्हाड, भास्करराव बनकर आदि उपस्थित होते. आमदार भाई जगताप यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या घटनेतील बदलानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निरीक्षक पाठविण्याचा निर्णय प्रदेश कॉँग्रेसने घेतला. जिल्ह्णातील १५ मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असून, ते ते निरीक्षक त्या त्या मतदारसंघात किमान दहा दिवस राहतील. त्यांच्या कामकाजावर पक्षाची करडी नजर राहील. निरीक्षकांनी त्या त्या तालुक्यात बूथ कमिट्यांपासून काम उभे करायचे आहे. पक्षाचे उमेदवारदेखील नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय पॅनलकडून अंतिम केले जातील.
पक्षाकडून त्या त्या मतदारसंघात कोणताही उमेदवार वरून लादला जाणार नाही. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी राष्ट्रवादीने पक्षाचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र आगामी निवडणुकांमध्ये युतीला शह देण्यासाठी काही ठिकाणी आघाडी करण्याची गरज असल्याचे सांगितले. बैठकीस जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील, माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, निर्मला खर्डे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)