चणकापूर, पुनंद हक्काचे पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही
By Admin | Updated: November 18, 2015 22:45 IST2015-11-18T22:44:44+5:302015-11-18T22:45:30+5:30
कळवण : सर्वपक्षीय बैठकीत निर्धार; पाणी आरक्षित करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव दाखल

चणकापूर, पुनंद हक्काचे पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही
कळवण : तालुक्यात असलेले चणकापूर, पुनंद या जलप्रकल्पांसह धनोली, भेगू, जामले, मळगाव या तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी व गिरणा धरण भरण्यासाठी पाणी जाऊ द्यायचे नाही म्हणून कळवण तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन व्यापक जनलढ्यातून तालुक्यातील पाणी वाचविले पाहिजे, अशी भूमिका कळवण येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कळवण तालुक्यातील चणकापूर, पुनंद व बागलाण तालुक्यातील केळझर, हरणबारी या जलप्रकल्पांसह तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडून गिरणा धरण भरण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी कळवण येथे पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, उपसभापती संजय पवार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय रौंदळ, रायुकॉँ तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, भास्कर भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी सांगितले की, कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी माजी मंत्री ए.टी. पवार यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्याकडे तब्बल ३० वर्षं पाठपुरावा करून पुनंद प्रकल्पाचे काम पूर्ण केले. कसमादे पट्ट्यातील शेतकरी बांधवाना वरदान ठरणाऱ्या पुनंदसह चणकापूर धरणातून व तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पातून एक थेंबही पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही. रक्तपात झाला तरी चालेल; पण आता पाणी हाच पक्ष असल्याने माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण तालुक्यात जनआंदोलन करून एक थेंबही पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.
शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार यांनी, राज्य सरकारचा निषेध नोंदवत केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या या सरकारचे डोके ठिकाणावर नाही त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या नाही, तालुक्यातील जनतेला वरदान ठरणाऱ्या जलप्रकल्पातून पाणी पळविण्याचा डाव कसमादे पट्ट्यातील शेतकरी बांधव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडून नाशिकचे पालकमंत्री पद भूषवायचे आणि जळगावची वकिली करणाऱ्या महाजनांनी जनतेच्या विरोधात भूमिका घेतली असून, पाणीप्रश्नी घेराव घालून जाब विचारल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही असे सांगून जळगावला पाणीपुरवठा जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी कसमादे पट्ट्यातील जलप्रकल्पासह लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी पळविण्याचा घाट घातला जात आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कसमादे पट्ट्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला असून, धरणे भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सुटला आहे. चणकापूरसह हरणबारी जलप्रकल्पावर पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शासनाचा निर्णय अन्यायकारक असून, भविष्यात पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागण्याची शक्यता गृहीत धरून पाणी सोडण्यास शेतकरी व सर्वसामान्य जनतेची भूमिका व भावना लक्षात घेऊन शासनाने पाणी पळविण्याचा प्रयत्न करून जनतेचा रोष पत्करून नये, असे आवाहन करून पाणीप्रश्नी जनआंदोलन करण्याचा इशारा दिला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी मुंबई व ब्राह्मणगाव येथे पाणीप्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीची माहिती देऊन २१ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी देवेंद्र कुशावह हे लोकप्रतिनिधी व जनतेचे मत जाणून घेणार असून,
१ डिसेंबर रोजी जलसंपदा व पाणीपुरवठा विभागाच्या त्रिसदस्यीय बैठकीत याचिकेवर सुनावणी होणार असल्याने कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवानी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील पाणी वाचविण्यासाठी कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले असल्याचे यांनी बैठकीत दिसून आले, बैठकीला शिवाजी हिरे, भास्कर भालेराव, अर्जुन बागुल, शीतलकुमार अहिरे, जगन पाटील, जवाहर हिरे, पंकज जाधव, संदीप वाघ, कौतिक गांगुर्डे, मनोहर बोरसे, रामा पाटील, सुभाष शिरोडे, विलास रौंदळ, राजेंद्र बागुल, प्रल्हाद गुंजाळ, संतोष गावित, राजू पाटील आदिंसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)