दिंडोरी तालुक्यात लसीकरणासाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:35+5:302021-07-04T04:11:35+5:30
तालुक्यातील वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयासह दहा आरोग्य केंद्रात व त्याचप्रमाणे उपकेंद्रांमध्ये गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, सदर ...

दिंडोरी तालुक्यात लसीकरणासाठी झुंबड
तालुक्यातील वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयासह दहा आरोग्य केंद्रात व त्याचप्रमाणे उपकेंद्रांमध्ये गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, सदर ठिकाणी पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. मात्र, लसींची संख्या कमी असल्याने गर्दी वाढत असून, सकाळपासून रांगा वाढत आहेत. टोकन वाटपाच्या वेळी गर्दी होत असून, आरोग्य कर्मचारी व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. दरम्यान, अडीच महिन्यांपूर्वी ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांना पहिला डोस दिला होता. त्यांच्यासाठी लस उपलब्ध होणे आवश्यक असताना त्या प्रमाणात लस मिळत नसल्याने, उपलब्ध लसीतून पहिला व दुसरा डोसचे नियोजन करताना अडचण होत आहे.
इन्फो
नियोजनाअभावी परवड
दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात गेली पाच दिवस कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होती. मात्र, ती फक्त दुसऱ्या डोस साठी देण्यात आल्याने पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांना दररोज माघारी जावे लागले, तर लसीकरण सुरू होण्यास विलंब होत असल्याच्याही तक्रारी आहेत. एकाच दिवशी पहिल्या व दुसऱ्या डोसचा कार्यक्रम असताना, त्या दिवशी अगोदर पहिला डोस दिल्यावर दुपारनंतर दुसरा डोस दिल्याने लाभार्थ्यांना सकाळपासून थांबावे लागले. शनिवारी कोविशिल्ड लस कार्यक्रम असताना, ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला माहीत नव्हते. अखेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तळेगाव आरोग्य केंद्रात लस आल्याचे सांगितल्यावर लस आणण्यात आली. मात्र, काही क्षणात टोकन संपले व रांगेत उभ्या अनेकांना माघारी जावे लागले.
कोट....
दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराची लोकसंख्या पाहता, येथे जास्त लसींची आवश्यकता आहे. मात्र, येथे पुरेशा लस उपलब्ध होत नाही, तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे कोणतेही नियोजन नाही. तळेगाव प्राथमिक केंद्रातर्फे प्रत्येक प्रभागात लसीकरण शिबिर घ्यावे.
- रणजीत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते