बिबट्या पकडण्यासाठी सरदवाडीत पिंजरा

By Admin | Updated: February 5, 2016 22:49 IST2016-02-05T22:48:51+5:302016-02-05T22:49:11+5:30

बिबट्या पकडण्यासाठी सरदवाडीत पिंजरा

Cage in Saradwadi to catch the leopards | बिबट्या पकडण्यासाठी सरदवाडीत पिंजरा

बिबट्या पकडण्यासाठी सरदवाडीत पिंजरा

सरदवाडी : सिन्नर तालुक्यातील सरदवाडी येथे ठाण मांडलेल्या बिबट्या मादीला पकडण्यासाठी वनविभागाने गुरुवारी दुपारी तातडीने पिंजरा लावला आहे. तथापि, सलग चौथ्या दिवशीही गावालगत बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांत दहशत कायम आहे.
बछड्यांसह बिबट्या मादीचा सरदवाडी गावालगत तीन दिवस सातत्याने वावर आढळून आल्यानंतर गुरुवारी ग्रामपंचायतीने पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे पत्राद्वारे केली होती. मानवी वस्तीलगत बिबट्याने ठाण मांडल्याच्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागानेही तातडीने गुरुवारी दुपारीच सरदवाडी येथे पिंजरा लावला आहे.
माजी सरपंच बजुनाथ सिरसाट यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचा मुक्काम असण्याच्या शक्यतेवरुन या शेतालगतच पिंजरा लावून त्यात भक्ष्य ठेवण्यात आले होते. तथापि, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नाही. सिन्नर बाह्यवळण रस्त्याच्या बाजूनेच सरदवाडी गावालगत तो भक्ष्याच्या शोधात असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पिंजऱ्याची जागा बदलण्यात आली असून, सिरसाट यांच्या डाळींब बागेत पिंजरा लावण्यात आला आहे.
दरम्यान, बिबट्याने परिसरातील मोकाट कुत्र्यांचा फडशा पाडण्याचा सपाटा लावल्याने कुत्र्यांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे.
गावाच्या पश्चिमेकडील चिखली नाला परिसरात अनेक कुत्र्यांची हाडे आढळून आली आहेत. सलग चौथ्या दिवशी गुरुवारी रात्री बिबट्या गावालगतच भक्ष्य शोधत असल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये त्याची दहशत कायम आहे. दिवस मावळतीला लागताच ग्रामस्थ घरांचा आसरा घेण्यास प्राधान्य देत असून रात्री अपरात्री घराबाहेर पडणेही टाळत आहे.

Web Title: Cage in Saradwadi to catch the leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.