बायपासप्रश्नी वकील संघ आक्र मक
By Admin | Updated: October 5, 2015 22:31 IST2015-10-05T22:26:39+5:302015-10-05T22:31:19+5:30
सटाणा : तहसीलदारांच्या कक्षात वकिलांचा चार तास ठिय्या

बायपासप्रश्नी वकील संघ आक्र मक
सटाणा : शहरातील बायपासप्रश्नी बांधकाम विभागाने दिलेले आश्वासन दिशाभूल करणारे आणि फसवे असल्याचे स्पष्ट झाल्याने सटाणा वकील संघ अधिक आक्र मक झाला आहे. सोमवारी संतप्त वकील संघाने कोर्टाचे कामकाज बंद ठेवून आपल्या मागणीसाठी येथील तहसीलदारांच्या कक्षात चार तास ठिय्या दिला. मात्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. झांबरे यांनी पुन्हा बायपासचा चेंडू भूसंपादन विभागाच्या कोर्टात टाकल्याने काम सुरू होण्याच्या आशा अधिकच धूसर झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, वकील संघ ठिय्या आंदोलनावर ठाम राहिल्याने बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, महसूल विभाग यांची वकील संघाच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिल्यानंतर तब्बल चार तासांनी ठिय्या मागे घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाल्याने शहराबाहेरून जाणाऱ्या बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला. आणि हा प्रश्न तडीस नेण्यासाठी सटाणा वकील संघाने आंदोलनाचे हत्त्यार उपसले. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी आमदार दीपिका चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. झांबरे, उपअभियंता पी. एम. राजपूत आणि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची 23 आॅगस्टला संयुक्त बैठक घेऊन शहराच्या पश्चिमेकडून मंजूर झालेल्या १२ किलोमीटर लांबीच्या बायपासच्या प्रत्यक्ष कामाला १ आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता झांबरे यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन फसवेच ठरल्याने वकील संघ संतप्त होऊन उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. काल सोमवारी सकाळी ११ वाजता संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली कोर्टाचे कामकाज बंद ठेवून तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या देऊन दिशाभूल करणाऱ्या यंत्रणेचा निषेध करण्यात आला. बायपासचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या वकील संघाच्या ठिय्या आंदोलनाला दोन तास उलटूनही प्रांताधिकारी, तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेचा एकही अधिकारी न फिरकल्याने संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी आंदोलनकर्ते वकिलांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र संबंधित आश्वासन देणारे अधिकारी समोर येईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. तब्बल चार तासांनी कार्यकारी अभियंता झांबरे आंदोलनाच्या ठिकाणी आले. आंदोलनकर्त्यांसमोर झांबरे यांनी पुन्हा दिलेला शब्द फिरवत प्रक्रि या सुरू करू असा शब्द आपण दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वकील अधिकच संतप्त होऊन दिशाभूल करू नका असे सुनावत संघाचे उपाध्यक्ष अॅड. नितीन चंद्रात्रे म्हणाले की, रस्ता तत्काळ न झाल्यास सावकीफाटा ते डांग्या मारुतीदरम्यान घडणाऱ्या अपघातांना बांधकाम विभागच जबाबदार राहील व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वकील संघ वेळोवेळी दाखल करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तर आंदोलनकर्त्यांनी बायपासचे काम सुरू होईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने माजी आमदार संजय चव्हाण यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या १६ तारखेला बांधकाम, भूसंपादन, महसूल या तिन्ही विभागांसह वकील संघाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात अॅड. सतीश चिंधडे, वसंतराव सोनवणे, सी. एन. पवार, संजय सोनवणे, रवींद्र पाटील, विष्णू सोनवणे, प्रकाश गोसावी, मधुकर सावंत, सोमदत्त मुंजवाडकर, नीलेश डांगरे, शोनकुमार देवरे,यशवंत सोनवणे, अभिमन्यू पाटील, रेखा शिंदे, सुजाता पाठक, सुरेखा ठाकूर, किरण देवरे, सरोज चंद्रात्रे आदि वकील सहभागी झाले होते. (वार्ताहर)