मोबाइल अॅपद्वारे करा जनावरांची खरेदी-विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:23 IST2017-08-27T00:23:32+5:302017-08-27T00:23:37+5:30
पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अॅप हे विनामूल्य असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅपद्वारे करा जनावरांची खरेदी-विक्री
नाशिक : पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अॅप हे विनामूल्य असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. स्नेहल गवळी व प्रीतम भट यांनी पत्रकार परिषदेत आपल्या संशोधनाची माहिती दिली. पशुपालक शेतकºयांकडून जनावरांची स्वखर्चाने वाहतूक करत बाजारात खरेदी-विक्री केली जाते. बाजारात पशुंची खरेदी-विक्री ही प्रामुख्याने दलालांमार्फत होत असते. त्यामुळे पशुपालकाला अपेक्षित किंमत मिळण्याची शाश्वती नसते शिवाय, कमिशनही मोजावे लागते. पशुपालकांची दलालांमार्फत होणारी फसवणूक टळावी यासाठी अॅनी मार्ट-फार्मर्स गाइड हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शेतकºयाकडे मोबाइल असल्याने या अॅपद्वारे त्यांना सहजपणे जनावरांची खरेदी-विक्री करता येऊ शकेल. या अॅपमध्ये पशुंची विक्री करण्यासाठी विक्रेत्याचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, पशुचा प्रकार, पशुची जात, वय, अपेक्षित किंमत तसेच पशुचे छायाचित्र टाकण्याची सोय आहे. यात गायी, म्हशी, मेंढ्या या व्यतिरिक्त कुत्रे, घोडे व उंट यांची खरेदी-विक्री करणे सोपे होणार आहे. पशुंच्या वाहतूक दराचीही माहिती या अॅपमध्ये देण्यात आल्याचे प्रीतम भट यांनी सांगितले.
विविध सेवाही उपलब्ध
अॅपमध्ये पशुपालनासंबंधी विविध सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात ज्या भागात पशुपालक शेतकरी पशुपालन व्यवसाय करत असेल त्या भागातील पशुवैद्यकांचे पत्ते अंतर्भूत करण्यात आले आहेत. अनेकदा रात्री-अपरात्री जनावरांच्या औषधांची आवश्यकता भासते. अशावेळी परिसरात कोणत्या ठिकाणी औषधे उपलब्ध होतील त्याची माहिती देण्यात आली आहे. सदर सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.