देवळ्यात खत दुकान भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:41 IST2017-07-18T00:40:49+5:302017-07-18T00:41:10+5:30
देवळ्यात खत दुकान भस्मसात; सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान

देवळ्यात खत दुकान भस्मसात
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : शहरातील आनंद अॅग्रो या बी-बियाणे व रासायनिक खतांच्या दुकानाला रविवारी (दि.१६) मध्यरात्री शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
देवळा बाजार समितीचे विद्यमान संचालक जगदीश पवार यांच्या मालकीचे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात आनंद अॅग्रो हे बी-बियाणे व रासायनिक खतांचे दुकान आहे. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून भऊर येथे निवासस्थानी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दुकानातील सर्व माल जळून भस्मसात झाल्याने सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले.सोमवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान कळवण रोडवर असलेल्या नागरी वसाहतीत चोर आल्याच्या संशयावरून परिसरातील नागरिक बाहेर आले होते. घराजवळच असलेल्या दुकानांसमोर बसले असता येथील रहिवासी किशोर सूर्यवंशी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप अहेर व संजय अहेर यांना समोरच असलेल्या दुकानातून धूर व आगीच्या ज्वाला निघत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला तसेच दुकानाचे मालक जगदीश पवार यांना फोन करून बोलावून घेतले, तर गस्ती पथकाबरोबर असलेल्या पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सटाणा येथील अग्निशामक केंद्राशी संपर्क साधत बंब मागवला.
शॉर्टसर्किट : आगीत २५ लाखांचे नुकसान
अग्निशामक बंब येईपर्यंत परिसरातील नागरिकांनी खासगी टॅँकरच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दुकानातील बियाणे व रासायनिक औषधांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशामक वाहनाने चार फेऱ्या केल्या. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले.आगीत कीटकनाशक, बियाणे, फर्निचर, संगणक संच, लॅपटॉप, ड्रीप खते, इपास मशीन, फिटिंग, रोख रक्कम असे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.