Businessmen oppose a complete ban on wedding ceremonies | लग्नसोहळ्यांवरील सरसकट बंदीला व्यावसायिकांचा विरोध

लग्नसोहळ्यांवरील सरसकट बंदीला व्यावसायिकांचा विरोध

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता संसर्ग : नियम पाळण्याची दिली ग्वाही

सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी न आणता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत ते सुरू ठेवण्याची मागणी लग्नसोहळ्यांसंबंधी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी केली आहे.

लग्न सोहळा हा जीवनातील महत्त्वाचा संस्कार आहे. या संस्कारात माणूस कोणतीही तडजोड करीत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते, त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.
अलीकडे लग्न हे घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात पार पाडले जातात. त्याठिकाणी सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळतात. लॉन्स, वाद्य, भोजन सुविधा, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, हार गुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा हे सर्व एकाच छताखाली मिळत असल्यामुळे मंगल कार्यालय अथवा लॉन्सला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. शिवाय लॉन्स-कार्यालय मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. ग्रामपंचायत लॉन्स चालू आहे किंवा बंद हे न पहाता वार्षिक व्यावसायिक कराची आकारणी करते. आता पुन्हा कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा गर्दी टाळण्यासाठी लग्न अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
शासन आदेशानुसार सामाजिक अंतर आणि आणि मास्क लावून नियमांचे पालन करीत लग्न सोहळे सुरू ठेवावेत अशी मागणी व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे.

एका लॉन्सवर किमान ५० बेरोजगार तरुण आणि २० व्यावसायिक अवलंबून असतात. त्यांचे कुटुंब यावर अवलंबून असते. कोरोना जरी वाढत असला तरी सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे पालन करणाऱ्या लॉन्सला शासनाने परवानगी द्यावी. छोट्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ येणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा त्यावर अवलंबून असणारे जवळपास ४० व्यवसाय बंद पडतील.
- शांताराम शिंदे, लॉन्सचालक

Web Title: Businessmen oppose a complete ban on wedding ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.