नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे बाजारात सुट्या नोटांच्या वाढलेल्या टंचाईचा फटका विविध व्यावसायिकांना बसला असून, किराणा व्यवसायापासून मालवाहतुकीपर्यंत सुमारे तीस ते पस्तीस टक्के प्रतिकूल परिणाम झाल्याचा दावा व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. रात्री बारा वाजेपासून या नोटा वैधानिकदृष्ट्या बाद ठरतील असे त्यांनी जाहीर केले असले तरी ३० डिसेंबरपर्यंत त्या बॅँकेत बदलता येतील, असे जाहीर केले. या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांची बुधवारपासून धावपळ उडाली. आपल्याकडील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाजारात खपविण्यासाठी खूपच गर्दी उडाली. त्यातच मंगळवारपासून किराणा दुकानापासून पेट्रोलपंपापर्यंत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. सरकारने पेट्रोल पंप आणि रुग्णालयांमध्ये या नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वच ठिकाणी नकार मिळत आहे. अन्य व्यावसायिक तर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा म्हटल्या की नकारच देत आहेत. या नोटा घेऊन बॅँकेत जमा करण्यासाठी रांगेत कोण उभे राहणार, तसेच बॅँकांमध्ये नोटा बदलून देताना किंवा भरताना अर्ज भरून घेतला जात असल्याने आयकर खात्याची आफत नको म्हणूनही व्यावसायिकांनी टाळाटाळ सुरू केली आहे. व्यावसायिक विक्रेते सामान्य नागरिकांचे हाल करीत असल्याचे चित्र त्यामुळे उभे होत असले तरी प्रत्यक्षात पाचशे, हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा आणि सुट्या नोटांची बाजारात टंचाई असल्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. लोक अत्यंत निकडीच्या वस्तूंपलीकडेच खरेदी करीत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी केलेल्या चर्चेनुसार कापड व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. विशेषत: छोटे रेडीमेड आणि होजिअरीची दुकाने ओस पडली आहेत. कपडे तातडीने खरेदी करणे गरजेचे नसल्यानेही अशी अवस्था झाल्याचे व्यासायिकांचे म्हणणे आहे. सुमारे ४५ टक्के व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्याखालोखाल मालवाहतुकीवर परिणाम झाला असून, नेहमी रोखीत चालणाऱ्या या व्यवसायाला सुमारे ३५ टक्के इतका फटका बसला आहे. या व्यवसायासाठी तीन लाख रुपये रोखीत लागतात. बॅँकांमधून इतकी रोकड काढताच येत नसल्याने मालमोटारीच बाहेर पाठवता येत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सध्या या व्यवसायावर तीस ते पस्तीस टक्के परिणाम झाला असून, निर्बंध असेच सुरू राहिले तर उर्वरित व्यवसाय मोडकळीस येण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे किराणा व्यवसायाला तीस टक्के फटका बसला आहे. त्याचे आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी कार्ड स्वाइप करून वस्तू खरेदी करता येत आहे. तसे मॉल आणि सुपर मार्केट वगळता अन्य किराणा दुकानात व्यवस्था नाही. औषधांच्या दुकानात आता औषधांव्यतिरिक्त अन्य कॉस्मेटिक व इतर वस्तूंची खरेदी मंदावली असल्याचे सांगण्यात येत आहे. चांगल्या हॉटेल्समध्ये पन्नास टक्के व्यावसायिकांकडे कार्ड पेमेंटची सोय असल्याने त्यांना अडचण येत नाही. मात्र, अशी व्यवस्था नाही तेथे अडचणी येतात. याशिवाय बहुतांशी रेस्तरॉँमध्ये ही व्यवस्था नसल्याने त्यांचे आणि गाडीवर व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकूणच हॉटेल व्यवसायावर २० ते २५ टक्के इतका प्रतिकूल परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.निर्णयाचे समर्थनच मात्रपंतप्रधानांनी काळापैसा नियंत्रित करण्यासाठी उचललेल्या पावलाचे सर्वच व्यावसायिक समर्थन करतात. मात्र, पुरेशा सुट्या नोटांची उपलब्धता झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला असता तर अधिक सोयीचे झाले असते असे व्यावसायिक मानतात. याशिवाय ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलणे शक्य असताना रात्री बारा वाजेपासून नोटा वैध राहणार नाहीत, असे जाहीर केल्याने अडचण झाली. पेट्रोल पंप आणि हॉस्पिटल्समध्ये हजार आणि पाचशेच्या नोटा चालतील असे जाहीर करण्यात आले त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिकांनाही तसे लागू केले असते तर अडचण झाली नसती असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
नोटा टंचाईमुळे व्यवसायांना फटका
By admin | Updated: November 16, 2016 00:56 IST