बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: June 29, 2017 00:37 IST2017-06-29T00:37:11+5:302017-06-29T00:37:27+5:30
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता सिन्नर बसस्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यां-विरोधात आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला.

बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता सिन्नर बसस्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यां-विरोधात आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. मंगळवारी बसस्थानक आवारातील सुमारे ५० अनधिकृत फलक राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हटविले. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्वास
घेतला. पालिका व महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग व बॅनर लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बॅनर व होर्डिंग लावून विद्रूपीकरणाचे काम सुरू राहाते. सिन्नर बसस्थानक आवारातही अनेकांनी वाढदिवस शुभेच्छा, दशक्रिया विधी, शैक्षणिक व व्यावसायिक जाहिराती असणारे बॅनर राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता लावले असल्याचे दिसून येते. त्यामुुळे बसस्थानकाच्या संरक्षक भिंती जाहिरातीच्या फलकांत हरवून गेल्याचे दिसत
होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नरला भेट दिली होती. त्यावेळी महामार्गावरील अनधिकृत बॅनर पाहून त्यांनी पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर पालिकेने अनधिकृत बॅनर जमा करण्याची मोहीम राबविली होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अनधिकृत बॅनर लावण्याचे काम शहरात ठिकठिकाणी सुरू आहे. त्यातून वर्दळीच्या ठिकाणी असणारे बसस्थानक अनधिकृत फलक लावणाऱ्यांचा केंद्रबिंदू ठरले होते. यापूर्वीही राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवून दोनवेळा अनधिकृत फलक हटवले होते. मात्र जाहिरातदारांनी पुन्हा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सिन्नर आगाराच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचे धाडस करून जाहिरातींचे फलक लावले होते.
१ नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बसस्थानकासमोर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. बस स्थानकातून बाहेर पडताना अनेकदा त्यांचा अडथळा निर्माण होतो. महामार्गावरील वाहने बसचालकांना बस बाहेर घेताना दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो.
२ मंगळवारी आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, स्थानकप्रमुख केशव सांगळे, वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात आवारात व संरक्षक भिंतीवर लावण्यात आलेले फलक उतरविण्यास प्रारंभ केला. छोटे-मोठे सुमारे ५० फलक या कारवाईत खाली उतरविण्यात आले. व्यावसायिक जाहिरातीसह अनेक प्रकाराच्या फलकांमुळे सिन्नर बसस्थानकाचा श्वास एकप्रकारे कोंडला गेला होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे.