खामखेडा-कळवण मार्गे बसची मागणी
By Admin | Updated: November 25, 2015 22:20 IST2015-11-25T22:19:24+5:302015-11-25T22:20:15+5:30
खामखेडा-कळवण मार्गे बसची मागणी

खामखेडा-कळवण मार्गे बसची मागणी
खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापूर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
साक्री-नामपुर-सटाणा-पिंपळदर- खामखेडा-पिळकोस-बेज-कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्रमांक
१७ असून, सदर रस्त्यावर भादवण-बेज गावादरम्यान दहा वर्षांपूर्वी पूल बांधून हा रस्ता तयार करण्यात आला.
सदर रस्ता तयार करतेवेळस या परिसरातील नागरिकांना आपल्याला नाशिक जाण्यासाठी थेट गावाहून बस सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु सदर रस्ता वाहतुकीस खुला होऊन दहा वर्षांहून अधिक कालावधी होऊनही या रस्त्यावर अजून नाशिक जाण्या-येण्यासाठी बस नाही.
या परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामानिमित्ताने किंवा आजारी पडल्यास उपचार करण्यासाठी नाशिक येथे जावे लागते. तसेच नाशिक जाण्यासाठी हां जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर नाशिक जाण्यासाठी व येण्यासाठी दिवसातून सकाळी, दुपारी,
सायंकाळी सटाण्याहून तसेच नाशिकहून सकाळ-दुपार-सायंकाळ अशी बससेवा सुरू केल्यास वेळेची बचत होणार आहे. सदर मार्गावर दिवसातून चार-पाच वेळा बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)