बसची दुचाकीला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:19 IST2017-07-18T00:19:03+5:302017-07-18T00:19:20+5:30
बसची दुचाकीला धडक; एक ठार

बसची दुचाकीला धडक; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : शहरातील कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयासमोर खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने दुचाकीस मागून धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला आहे.
शेख रईस शेख सिराजुद्दीन (३०) रा. नांदेडी शाळेजवळ याने फिर्याद दिली. अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या दरम्यान कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयासमोर नॅशनल ज्युसजवळ फुले पुतळ्याकडून एकात्मता चौकाकडे जात असताना खासगी ट्रॅव्हल्स बसने पुढे चालणाऱ्या दुचाकीस (एमएच ४१ एई २३९९) धडक दिली. यात फिर्यादी शेख रईस शेख सिराजुद्दीन व शेख अकील शेख नजलेसाब (२५) रा. गुलशेरनगर हे दोघे जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेख अकील यांचा आज सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खासगी बसचालका-विरोधात अपघात करून फिर्यादीच्या दुखापतीस व साक्षीदाराच्या मरणास कारणीभूत झाला व अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
शेख अकील हा तरुण कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या मामांच्या आडत दुकानात डाळिंब पॅकिंगचे काम करीत होता. अकील हा स्वभावाने शांत व मनमिळवू होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गुलशेरनगर भागात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन बहिणी, आठ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.