Burning of car unknown miscreants tried to scare away | अज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न
अज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न

नाशिक : पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.22) पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हे भगवतीनगरला राहत असून, रविवारी (दि.21) रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा (एमएच 15-जीएफ-8089) गुरुकृपा बंगल्याबाहेर उभी केली असताना अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल ओतून पेटवून दिली.

काही वेळाने जोराचा आवाज झाल्याने नागरिक जागे झाले, त्यानंतर काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली असता गाडी जळताना दिसली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली व नंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्र जवानांनी धाव घेत चारचाकी विझविली.

भरवस्तीत घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.


Web Title: Burning of car unknown miscreants tried to scare away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.