-----
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील जाफरनगर भागातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार सय्यद हे करीत आहेत.
-----
शासकीय निवासस्थानातून इलेक्ट्रीक वस्तूची चोरी
मालेगाव : येथील शासकीय सह्याद्री बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने ४ पंखे चोरून नेले आहेत. याप्रकरणी किशोर देवराम मराठे यांनी फिर्याद दिली आहे. बंगल्यातील जुने वापरते ३ हजार १०० रुपये किमतीचे ४ पंखे चोरून नेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आखाडे करीत आहेत.
----
पती विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल
मालेगाव : तलाक झाला असताना पत्नीला चाकूचा धाक दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या खालीद उमर मोहंमद हनीफ (४७) रा. गुलशन मलीक याच्याविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. तलाक झाला असतानाही शिवीगाळ व दमदाटी तसेच मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन चाकूच्या धाकाने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. गोपाळ हे करीत आहेत.
-----
दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी
मालेगाव : येथील महाराष्ट्र सायझिंगसमोर दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सोपान जिभाऊ पवार रा. चिंचावड हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे दुचाकी (क्रमांक एमएच ४१ एम २७९५) वरुन जात असताना दुचाकी (क्रमांक एमएच ४१ बीए ७१३६, चालकाचे नाव माहीत नाही) वरील चालकाने धडक दिली. यात पवार जखमी झाले आहेत. पुढील तपास हवालदार एस. के. माळी करीत आहेत.
-----
सुभाषवाडीजवळील अपघातात तरुणीचा मृत्यू
मालेगाव : मालेगाव - नामपूर रस्त्यावर सुभाष वाडीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली पूनम यशवंत पिंपळसे (२०) रा. अंबासन हिचा मृत्यू झाला आहे. गाडी (क्रमांक एमएच ४१ एयु ०२०१) वरील चालक खंडू विश्राम गवळी याने नामपूरकडून मालेगावकडे जात असताना दुचाकीला (क्रमांक एमएच ४१ बीसी ७५१७) धडक दिली. या धडकेत पूनम हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास बी. एस. साळुंके करीत आहेत.
-----
विवाहितेचा छळ; चौघा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : बुलेट घेण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या किशोर विठ्ठल भगने रा. भिंगार, ता. अहमदनगर याच्यासह चौघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सारिका किशोर भगने या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती किशोर भगने, सासू, सासरे, नणंद यांनी शिवीगाळ करीत तसेच बुलेट घेण्यासाठी पैसे आणावेत म्हणून मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मोरे करीत आहेत.
-----