घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: May 7, 2016 22:32 IST2016-05-07T22:25:41+5:302016-05-07T22:32:35+5:30

तिघांना अटक : चार एलईडी टीव्हीसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Burglary gang rape | घरफोडी करणारी टोळी जेरबंद

घरफोडी करणारी टोळी जेरबंद

लासलगाव : काही दिवसांपासून लासलगाव परिसरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या टोळीचा छडा लावण्यात लासलगाव पोलिसांना यश आले असून, तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून चार एलईडी टीव्हीसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथे घरे, बंगले घरफोडी करणाऱ्या चोरांनी लागोपाठ केलेल्या घरफोड्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते.
सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व सहकारी पोलीस कर्मचारी लासलगाव व विंचूर परिसरात गस्त घालत असताना विंचूर ेयेथील साईबाबा मंदिर परिसरात एक कार संशयास्पद दिसून आली. पोलिसांना पाहताच संशयित चालकाने गाडीसह तेथून धूम ठोकली. पोलिसांचा संशय अधिक बळावला त्यानंतर गस्त अधिक कडक करण्यात आली. (एमएच ४ बी ८०४३) या सेंट्रो गाडीसह लासलगाव येथील अजय सुनील वडनेरे (सध्या रा. नेवगे कॉम्प्लेक्स, विंचूर ) व भाऊसाहेब संजय निकम (रा. गोंदेगाव) यांना लासलगाव येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी लासलगाव येथे सहा, तर विंचूर येथील दोन अशा आठ घरफोड्यांची कबुली दिली. यानंतर लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी त्यांचा अजून एक साथीदार मनोज राजेंद्र रणशूर (रा. गोंदेगाव ) यास अटक केली.
लासलगाव येथील चोऱ्या उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करण्यात यश संपादन केल्याबद्दल निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे व पोलीस कर्मचाऱ्याचे लासलगावकरांनी अभिनंदन केले. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक आवारे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब बिन्नर, मुद्दसर शेख ,योगेश शिंदे, राजेश घुगे, संजीव मोरे, मधुकर उंबरे, वाल्मीक पवार, दीपक सांगळे व वैदकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
या चोरांकडून पाळत ठेऊन बंद घरांना लक्ष्य केले जात होते. स्थानिक पातळीवरील गुन्हेगार असतील हा दावा बरोबर ठरला आहे.
निफाड न्यायालयात या संशयितांना हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)

Web Title: Burglary gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.