इंदिरानगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी
By Admin | Updated: September 15, 2014 18:11 IST2014-09-15T00:49:50+5:302014-09-15T18:11:24+5:30
इंदिरानगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी

इंदिरानगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली़ विशाखा कॉलनीतील मोहन संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा अश्विनीकुमार शेरे यांच्या बंद घराचा शुक्रवारी कडीकोयंडा तोडून लोखंडी व लाकडी कपाटातील ४९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घरफोडीची घटना पखालरोडवरील पिंक सुपर शॉपीमध्ये घडली़ शनिवारी रात्री दीड ते पहाटे सात वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पुजारीनगरमध्ये असलेल्या या शॉपीच्या दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांचे तेलाचे डबे, काजू, बदाम, मनुके, खजूर, शाम्पू असा ३२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी चेलाराम सुजाराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रोडरोमियोंवर कारवाईची मागणी
नाशिक : गंगापूररोड परिसरातील आसारामबापू आश्रम, सुयोजित गार्डन व नदीकिनारील परिसरात अश्लील चाळे करणारे प्रेमीयुगुल व रोडरोमियोंवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे़ आसारामबापू आश्रम व सुयोजित गार्डन परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असतात़ तसेच मद्य प्राशन करून फिरणाऱ्या रोडरोमियोंचा परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे़ अनेक मद्यपी या रस्त्यावर मोटारसायकलचा स्टंट करण्याचा प्रयत्न करत असल्याने अपघात होत आहेत़ पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी मोहीम राबविण्यात येत असली तरी त्यात सातत्य नसल्याने प्रेमीयुगुलांवर पोेलिसांचा अंकुश राहिला नसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आहे़