घोटी येथे घरफोडी
By Admin | Updated: October 20, 2016 00:54 IST2016-10-20T00:52:11+5:302016-10-20T00:54:32+5:30
दहशत : साडेतीन लाखाचा ऐवज लंपास

घोटी येथे घरफोडी
घोटी : शहरातील नवनाथनगर येथील भरवस्तीतील तांदूळ व भगर मिल व्यावसायिक तुषार इंदरचंद सुराणा यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत सुमारे तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले.
मागील काही दिवसात घोटी शहरात धाडसी चोऱ्या झालेल्या असताना एकही चोरीची उकल झालेली नसून चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असल्याने शहरातील व्यापारीवर्ग भयभीत झाला आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांनी केली आहे.
घोटी शहरातील नवनाथनगर येथील शहरातील तांदूळ व भगर मिल व्यावसायिक तुषार इंदरचंद सुराणा आपल्या कुटुंबासह राहतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील गेस्ट रूमच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन लाख ५८ हजार रु पये किमतीचे सोन्या-चांदीने दागिने लंपास केले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास सदरील प्रकार त्याचा लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबतची तक्र ार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शेळके, उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार सुहास गोसावी आदि करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेतली मात्र यश आले नाही.(वार्ताहर)