बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा मुख्य केंद्रांवर बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:06+5:302021-04-23T04:16:06+5:30
नाशिक : राज्य शासनाने महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावीची परीक्षा रद्द केली असून ...

बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा मुख्य केंद्रांवर बोजा
नाशिक : राज्य शासनाने महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेची ७० टक्के तयारी पूर्ण केली असून मुख्य केंद्रांना कोऱ्या उत्तर पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या कोऱ्या उत्तर पत्रिकांच्या सुरक्षेचा बोजा येऊन पडल्याने केंद्र प्रमुखांचा ताप वाढला आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून मुख्य परीक्षा केंद्रांना उत्तपत्रिकांसोबत नकाशे, पुरवण्या, आलेख, अंतर्गत गुणपत्रक, उपस्थिती नोंदपत्रक आदी विविध साहित्य पोहोचविण्यात आले असल्याने या सर्व साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही संबंधित केंद्र प्रमुखांवर असणार आहे. त्यामुळे या केंद्रप्रमुखांना बारावी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर होऊन परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
--
परीक्षा कधी
राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, या परीक्षा कधी होणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही.
--
पुढील प्रवेश कधी
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी )दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र, या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी अद्याप स्पष्ट सूचना नसल्याने या विद्यार्थ्यांची पुढील प्रवेश प्रक्रिया कशी व कधी राबविली जाणार याविषयी अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
--
हे साहित्य कस्टडीत
राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने दहावीच्या परीक्षेचे कोणतेही साहित्य वाटप नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने केलेले नाही. मात्र, बारावीच्या कोऱ्या उत्तर पत्रिकांसोबतच नकाशे, पुरवण्या, आलेख, अंतर्गत गुणपत्रक, उपस्थिती नोंदपत्रक, आदी विविध साहित्य मुख्य केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे हे साहित्य आता मुख्य केंद्र प्रमुखांच्याच कस्टडीत आहे.
--
दहावी
विद्यार्थ्यांची आकडेवारी
दहावी - ९८,९४९
बारावी - ६७,९१८
---
मुख्याध्यापक म्हणतात..
दहावीच्या परीक्षांचे कोणतेही साहित्य अद्याप शाळास्तरावरील केंद्रांना पोहोचलेले नाही. विभागीय मंडळाने पर्यवेक्षकांची माहिती मागवली होती. त्यानुसार, शाळांनी संबधित माहिती विभागीय मंडळाला सादर केली आहे.
गुलाब भामरे, मुख्याध्यापक, मराठा विद्यालय
--
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले आहे. परीक्षा मंडळाने तपासणीसांचा तपशील मागविला होता,). त्यानुसार माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय परीक्षा संदर्भात कोणताही कार्यवाही झालेली नाही.
- किशोर पालखेडकर, मुख्याध्यपक, नवरचना विद्यालय.
--
दहावी, बारावीच्या परीक्षांपूर्वी पूर्वतयारीचा भाग म्हणून विभागीय मंडळाला आवश्यक ती कार्यवाही करावी लागते. परंतु, यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे केवळ बारावीच्याच परीक्षा साहित्याचे मुख्य केंद्रांपर्यंत वाटप करण्यात आले असून कोऱ्या उत्तरपत्रिकांसोबत अन्य साहित्य मुख्य केंद्रप्रमुखांच्या कस्टडीत सुरक्षित आहे. या साहित्याच्या सुरक्षिततेविषयी संपूर्ण दक्षता घेतली जात आहे.
- के. बी. पाटील. अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ