बांधकाम परवानगी सिडकोकडेच
By Admin | Updated: September 27, 2016 01:22 IST2016-09-27T01:21:46+5:302016-09-27T01:22:23+5:30
सहावी योजना : हस्तांतरणास पाच महिन्यांचा कालावधी उलटला

बांधकाम परवानगी सिडकोकडेच
सिडको : सिडको प्रशासनाच्या ताब्यातील सहावी योजना ही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही बांधकाम परवानगीचे अधिकार मात्र सिडकोने आपल्याकडेच ठेवले असल्याने याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला सिडकोच्या सहावी योजना हस्तांतरणाचा प्रश्न सिडको प्रशासन व महापालिका यांच्यात समझोता झाल्याने अखेरीस गेल्या एप्रिल महिन्यात मार्गी लागल्यामुळे आता खऱ्या अर्थाने सहाव्या योजनेतील नागरिकांचे मूलभूत प्रश्नांसह विकासकामे सुटण्यास मदत होणार आहे. सहावी योजना हस्तांतरण झाल्यामुळे आता सिडकोच्या एक ते सहा या सर्वच योजना मनपाकडे हस्तांतरित झाल्या आहेत. सहावी योजना हस्तांतरणासाठी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर व तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ही हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सहावी योजना हस्तांतरण झाल्यानंतर सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर सिडकोच्या सर्व सहाही योजनांच्या बांधकाम परवानगीचे अधिकार हे मनपाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, एक महिन्याच्या कालावधीत हे अधिकार मनपाकडे वर्ग केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही बांधकाम परवानगीचे अधिकार मात्र अद्यापही सिडकोकडेच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)