जगाला आकर्षण वाटेल असे शहर घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:35+5:302021-02-05T05:44:35+5:30

नाशिक : मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमातील तांत्रिक उणिवांमुळे झोपडपट्या उभ्या राहिल्या असून, नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत. या ...

Build a city that will appeal to the world | जगाला आकर्षण वाटेल असे शहर घडवा

जगाला आकर्षण वाटेल असे शहर घडवा

नाशिक : मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमातील तांत्रिक उणिवांमुळे झोपडपट्या उभ्या राहिल्या असून, नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत. या त्रुटी डोळ्यासमोर ठेवून नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनी जगाला आकर्षण वाटेल, असे शहर घडविण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

क्रेडाई महाराष्ट्रतर्फे नाशकात आयोजित ‘क्रेडाई महाराष्ट्र लीडरशीप कॉनक्लेव्ह २०२१’च्या समारोपप्रसंगी ‘शहराच्या विकासात बांधकाम क्षेत्राचे महत्त्व’ या विषयावर उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे माजी सचिव महेश झगडे, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, सल्लागार जितूभाई ठक्कर, खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख, सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर, डॉ. कैलास कमोद यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकमध्ये विमानतळ, चौपदरी महामार्ग, बोटक्लब यासारख्या सुविधांसह नवीन डीसीपीआरमध्ये सायकल ट्रॅकचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. यासोबतच येथील निसर्गरम्य वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत शहरात राहण्यासाठी मुंबई, पुण्यातूनही नागरिक आकर्षित होतील, असे शहर निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

इन्फो-

एनए विषयी पुनर्विचार आवश्यक

घरांच्या किमतीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक जमीन असून, एनए जमिनीच्या उपलब्धतेचा थेट परिणाम घरांच्या किमतीवर होतो. त्यामुळे एनए हा प्रकार गरजेचे आहे की नाही याविषयी पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कोरोनाकाळात थांबलेला बांधकाम व्यवसाय सुरू करून अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या डीसीपीआरच्या निर्णयाने बांधकाम क्षेत्राला उभारी दिल्याचे नमूद करतानाच मुद्रांक शुल्कावरील सवलतीने बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती मिळाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

इन्फो-

जीएसटीच्या प्रश्नावर केंद्राकडे बोट

बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने जीएसटीच्या दरामध्ये १८ टक्क्यांहून कपात करून १२ टक्के करण्याची मागणी क्रेडाईकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएसटीचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित असून, क्रेडाई राष्ट्रीयचे अध्यक्ष सतीश मगर यांनी थेट केंद्रात पाठपुरावा करण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

(फोटो-३० पीएचजेएन९७,९८)

Web Title: Build a city that will appeal to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.