तरुणांकडे नेणारा अर्थसंकल्प
By Admin | Updated: February 4, 2017 23:47 IST2017-02-04T23:47:10+5:302017-02-04T23:47:31+5:30
चंद्रशेखर टिळक : ‘अर्थसंकल्प २०१७’ विश्लेषणात प्रतिपादन

तरुणांकडे नेणारा अर्थसंकल्प
नाशिक : अर्थसंकल्पात बँकिंग व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या असून, या माध्यमातून कॅशलेस तथा लेसकॅशचे अर्थव्यवस्थेचे लक्ष साधणे शक्य आहे. परंतु, पन्नाशी ओलांडलेल्या सुशिक्षित व्यक्तीही सढळ हाताने रोखीत व्यवहार करतात. त्या तुलनेत तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार होत असल्याने अर्थसंकल्पातील विविध तरतुदी तरुणांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आल्या असून, हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेला तरुणांकडे नेणारा असल्याचे विश्लेषण
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमधील सभागृहात ‘बजेट २०१७’ विषयावर बोलताना टिळक यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. अध्यक्षस्थानी अतुल पाटणकर होते. याप्रसंगी टिळक यांनी विमुद्रीकरण, जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीतील वाढ, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या परवानगीने येणारा अर्थसंकल्प यादृष्टीने हा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या सूचनांनंतर अर्थसंकल्पातील तरतुदी बघता २०१९ च्या लोकसभा निवडणुकींपूर्वी अशाचप्रकारे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तसेच सध्याच्या स्थितीत पेट्रोलियम पदार्थांच्या वाढणाऱ्या किमतीही झपाट्याने कमी होतील, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. तसेच नोटांची कायदेशीर मान्यता काढून घेण्याचा निर्णय (विमुद्रीकरण) जाहीर झाल्यापासून देशात अर्थसंकल्पात बँकिंग ट्रॅन्झेक्शन टॅक्स लागू होण्याची चर्चा होती. परंतु, अर्थसंकल्पीय भाषणात याबाबत एक शब्दही नसल्याचे दिसले. सिक्युरिटी ट्रॅन्झेक्शन टॅक्सचे दरही अर्थसंकल्पात वाढणार, अशीही चर्चा होती. पण याही शब्दाचा एकदाही उल्लेख अर्थसंकल्पात झाला नसल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक श्रीराम झाडे यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता चांदोरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)