अंदाजपत्रकाची ‘लगीनघाई’
By Admin | Updated: January 25, 2015 23:25 IST2015-01-25T23:24:39+5:302015-01-25T23:25:38+5:30
मनपा प्रशासनाची कसरत : स्थायीपुढे जाण्यासाठी यंदाही लागणार विलंब

अंदाजपत्रकाची ‘लगीनघाई’
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे आकडेवारीचा गोषवारा असलेले अंदाजपत्रक जानेवारीअखेरच आयुक्तांनी स्थायी समितीपुढे सादर करणे आवश्यक असते, परंतु गतवर्षाप्रमाणे यंदाही स्थायीपुढ्यात जाण्यासाठी अंदाजपत्रकाला फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. महापालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती, सिंहस्थ कामांसाठी निधीची चणचण आणि नगरसेवकांचा विकासकामांसाठी वाढता दबाव अशा त्रांगड्यात सापडलेल्या प्रशासनाला आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
सर्वसाधारणपणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीच्या आत आयुक्तांनी स्थायी समितीला सादर करणे अपेक्षित असते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत असल्याने त्यापूर्वीच स्थायीकडून अंदाजपत्रकात दुरुस्ती होऊन मंजुरी मिळवून घेतली जाते आणि मार्च महिन्याच्या आत स्थायीकडून सदर अंदाजपत्रक महासभेवर ठेवून त्यास अंतिम मंजुरी घेतली जाते.
गतवर्षी संजय खंदारे आयुक्त असताना त्यांनी सुरुवातीला ३१ जानेवारीला अंदाजपत्रक सादर करण्याचे घोषित केले होते; परंतु दोन-तीन वेळा मुहूर्त हुकला आणि अखेरीस १४ फेब्रुवारीला अंदाजपत्रक स्थायीपुढ्यात आले. यंदा नवनियुक्त आयुक्त डॉ. गेडाम हे आपले पहिले अंदाजपत्रक स्थायीपुढे ठेवणार आहेत.