भाववाढ : चाळीत कांदा शिल्लक नसल्याने सात हजारांचा टप्पा गाठण्याचे संकेत
By Admin | Updated: August 21, 2015 00:45 IST2015-08-21T00:44:23+5:302015-08-21T00:45:57+5:30
येवल्यात कांदा ५७०० रुपये क्विंटल

भाववाढ : चाळीत कांदा शिल्लक नसल्याने सात हजारांचा टप्पा गाठण्याचे संकेत
येवला : येवला मार्केट यार्डवर गुरुवारी ३५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याचे भाव ५७०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडे चाळीत केवळ एक लाख क्विंटल कांदा शिल्लक राहिल्याचा अंदाज आहे. शनिवारी सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल कांदा विकला गेला होता. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढल्याने अर्थशास्त्रीय नियमाने कांदा भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत होते. हंगामातील हा सर्वोत्तम कांदा भाव आहे. कांदा सात हजारी गाठणार असल्याचा अंदाज आहे.
येवला तालुक्यात सध्या २० टक्के कांदा ग्रामीण भागात चाळीत शिल्लक आहे. भाववाढीच्या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा ठेवला आहे. कांदा भावात तेजी वाढेल व आॅगस्ट महिन्यात चांगल्या प्रतीच्या कांद्याला पाच हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल बाजारभावाचा टप्पा गाठला जाईल, असा जाणकारांनी व्यक्त केला होता. हा अंदाज चुकवत कांदा ५७०० पयापर्यंत पोहचला. भारताची देशांतर्गत गरज ४५० लाख मेट्रिक टन म्हणजे प्रतिमहिना ३५ लाख मेट्रिक टन आहे. संपूर्ण उन्हाळ हंगामात ३० ते ४० लाख मेट्रिक टन साठवणूक झाल्याचा अंदाज आहे. मात्र आॅगस्ट ते आॅक्टोबर ८० ते ८५ लाख टन कांद्याची गरज आहे. म्हणजेच सुमारे ४५ ते ५० लाख टन कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. चांगला दिसणारा कांदादेखील १५ दिवसात चाळीत सडू लागला होता. तो कांदा शेतकऱ्यांनी यापूर्वीच मार्केटला विकला आहे. सध्या टिकणारा कांदा चाळीत आहे. परंतु शिल्लक कांद्यातून मोठी गरज भागली जाणार नाही. पाकिस्तानमध्ये कांद्याची मागणी वाढली आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर पाकिस्तानमध्ये ही टंचाई भासणार आहे. या पाशर््वभूमीवर भारतातून पाकिस्तानला कांदा निर्यात केला तरी फायदा आहे. दिल्लीत सध्याचा भाव ४५ ते ५० रुपये किलो आहे, आणि ५५ ते ६० रुपयांपर्यंत गेला तरी शेतकरी जगवायचा असल्यास त्याची अधिक ओरड होऊ नये ही अपेक्षा आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील कांदा सध्या ५७०० रुपये क्विंटल आहे. मुळात कांद्याचे उत्पन्न कमी असल्याने शिल्लक कांदा अधिक काळ पुरवता येणार नाही. यामुळे आॅगस्ट अखेरीस कांदा सात हजाराचा टप्पा गाठू शकतो, असा जाणकारांचा होरा आहे. यंदा केंद्राने कांदा आयातीचे भूत उभे करून भाव पडू नये, अशी अपेक्षा आहे. कांदा आवक व भाववाढ हा वेग लक्षात घेतला तर उन्हाळ कांदा शेतकऱ्याला परिणामकारक भाव देत आहे. भारताची देशांतर्गत गरज आणि केली गेलेली साठवणूक याच्या गणितानुसार मात्र आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात एकूण सुमारे ८० ते १०० लाख टन कांद्याची गरज आहे. आता पाऊस पडला तर नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये नवीन कांदा मार्केटला येण्याचा अंदाज आहे. सध्या शिल्लक असलेला उन्हाळ कांदा जेमतेम सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल. त्यापुढे आॅक्टोबरपर्यंत टंचाई निर्माण होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून कांद्याचे भाव चांगलेच तेजी गाठण्याची शक्यता आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळण्याची चिन्हे आहेत. २६ जूनपासून केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य ४२५ डॉलर प्रतिटन केले आहे व निर्यात अगोदरच रोखली आहे. सर्वसामान्य लोकांनीदेखील बळीराजाच्या हितासाठी कांदा भावाची अधिक ओरड करू नये, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)