पोटच्या गोळ्यानेच केला जन्मदात्यांसह भावाचा खून!
By Admin | Updated: June 8, 2017 00:25 IST2017-06-08T00:25:21+5:302017-06-08T00:25:38+5:30
तिहेरी खून प्रकरण : भांडणास त्रासून केली हत्या

पोटच्या गोळ्यानेच केला जन्मदात्यांसह भावाचा खून!
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लहानपणापासूनच धाकट्या भावाच्या चुका आई-वडील पोटात घालतात मात्र, आपणास शिव्यांचेच धनी व्हावे लागते, सापत्नपणाची वागणूक तर नेहमीचीच़ त्यातच धाकट्या भावाच्या अनैतिक संबंधांमुळे घरात सुरू असलेल्या वादामुळे थोरला मुलगा सोमनाथ जगन्नाथ शेळके यानेच जन्मदाते आई-वडील व भावाचा खून केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी बुधवारी दिली़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस या खुनाचा उलगडा करण्यास यश आले आहे़
दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथे ३० मे रोजी जगन्नाथ शेळके, शोभा जगन्नाथ शेळके आणि हर्षद जगन्नाथ शेळके या तिघांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ मृतदेहांवरील दागिने तसेच घरातील वस्तूही जागेवरच आढळून आल्याने खुनाचे नेमके कारण काय याबाबत पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ सोमनाथ शेळके याच्या फिर्यादीवरून वणी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तीन पथके तयार केली होती़ कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतरही चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसलेला फिर्यादी सोमनाथवर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याचे वागणे संशयास्पद आढळून आले़ यानंतर पोलिसी खाक्या न दाखविता भावनिक साद घातल्यानंतर त्याने आई, वडील व भाऊ या तिघांचा ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने खून केल्याची कबुली दिली.
घरातील थोरला मुलगा असून, तसेच शेतीची सर्व कामे करूनही शिव्याच खाव्या लागत असे़ मात्र लहान भाऊ हर्षद हा काहीही कामधंदा करीत नसूनही आई-वडील त्याच्या चुकांकडे काणाडोळा करीत असल्याचा राग सोमनाथच्या मनात होता़ मे महिन्याच्या अखेरीस धाकटा भाऊ हर्षदचे अनैतिक संबंध उघडकीस आले व त्यावरून घरात वाद सुरू झाले़ यानंतर आई-वडील, तुही धाकट्यासारखाच आहेस, दारू पितो, तुझेही अनैतिक संबंध असतील, असे सारखे टोचून बोलत असत़ याच कारणावरून ३० मे रोजी सकाळी सोमनाथला वडिलांनी शिवीगाळ केली होती़ त्यामुळे रागाच्या भरात सोमनाथने या तिघांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, अरुण पगारे, रामहरी मुंढे, हवालदार रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, अमोल घुगे आदिंनी यशस्वीरीत्या या खुनाचा उलगडा केला़
सोमनाथचा स्वभाव रागीट
२०१३ मध्ये शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटण्यावरून वडील सोमनाथला रागावले होते़ तेव्हा त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यास छोट्या-छोट्या कारणांवरून राग येत असल्याचे पोलिसांनी सांगितले़
पोलीस यंत्रणाही चक्रावली
एकाच कुटुंबातील तिघांच्या खुनामागे चोरी वा स्थावर मालमत्ता असे कोणतेही कारण समोर येत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ त्यामुळे त्यांनी मयत हर्षदचे अनैतिक संबंध असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली, मात्र हाती काही लागले नाही़ त्यात फिर्यादी सोमनाथकडे खून करण्यासारखे ठोस कारण नसल्याने पोलिसांना त्याबाबत प्रथम शंका आली नाही़ मात्र, त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची चौकशी केली व अखेर सत्य बाहेर आले़