कनाशी गटात इच्छुकांची भाऊगर्दी

By Admin | Updated: January 7, 2017 00:39 IST2017-01-07T00:38:57+5:302017-01-07T00:39:10+5:30

जिल्हा परिषद अध्यक्षपद लाभलेला गट : विकास अन् जनसंपर्काभोवती फिरणार निवडणूक

Brotherhood in Kanasashi Group | कनाशी गटात इच्छुकांची भाऊगर्दी

कनाशी गटात इच्छुकांची भाऊगर्दी

 मनोज देवरे कळवण
जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी व पशुसंवर्धन सभापती आणि कळवण पंचायत समिती सभापतिपद लाभलेल्या कनाशी गटात यंदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाल्याने या गटात इच्छुकांनी गेल्या दोन महिन्यांपासून चांगलीच भाऊगर्दी केली आहे. मतदार जनतेशी असलेला जनसंपर्क, उभी केलेली विकासकामे, प्रश्न व समस्या सोडविण्याची धमक आणि पाठपुरावा याचा लेखाजोखा या गटातील मतदारांकडे असल्याने विकास आणि जनसंपर्काच्या भोवताली यंदाची निवडणूक फिरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री पवार यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद, काँग्रेसचे शैलेश पवार यांच्या रूपाने जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापतिपद व राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर जाधव यांच्या रूपाने पंचायत समिती सभापतिपद याच गटाला मिळाल्याने पदाधिकारी मिळविण्यात कनाशी गट नशीबवान ठरला आहे. सन २००७च्या सार्वत्रिकनिवडणुकीत बापखेडा गणातून राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या जयश्री पवार यांनी या गण व गटात सातत्याने जनसंपर्क ठेवून महिला बचतगटांची स्थापना व विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे सन २०१२मधील जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव निघाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून निवडणुकीदरम्यान त्यांचे नाव चर्चेत आले. महिला सर्वसाधारण असलेल्या या गटात सर्वाधिक गावे व मतदारसंख्या आदिवासी असल्याने जनसंपर्क अन् मतदारांवर असलेला प्रभाव, पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामे व जनसंपर्क याचा फायदा त्यांना झाला. मूळच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जयमाला खांडवी यांनी कॉँग्रेसमध्ये पक्षांतर करून काँग्रेसकडून या गटातून निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांना अपयश आले होते. या गटात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीतील घटक पक्षांमध्ये लढत झाली होती. अन्य पक्षांना प्रभावी उमेदवार मिळाले नव्हते. ए.टी. पवार यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या या गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे पुत्र खर्डे दिगर गटाचे सदस्य नितीन पवार, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, भाजपाकडून खासदारपुत्र समीर चव्हाण, काँग्रेसकडून माजी सभापती काशीनाथ गायकवाड यांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे.

Web Title: Brotherhood in Kanasashi Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.