निफाड तालुक्यातील उगाव येथे सुनील कासुर्डे व श्रद्धा कासुर्डे यांच्या मालकीचे विश्वेश्वर कृषीसेवा केंद्र आहे. या दुकानातून ज्या शेतकऱ्यांनी उधारीवर माल खरेदी केला आहे, त्याच्या वसुलीसाठी कासुर्डे यांनी चक्क गुंडांच्या टोळीला सुपारी देऊन धमकावणे सुरू केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. याबाबत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी सदर दुकान मालकासह संबंधित गुंडांवर मोकाअंतर्गत कारवाई करावी आणि दुकानमालकाला शासनाकडून देण्यात आलेला शेतीमित्र पुरस्कार परत घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दुकानमालक भाईने दुसऱ्या भाईमार्फत शेतकऱ्यांना धमकावण्याच्या या प्रकरणाची चर्चा रंगात आलेली असतानाच आता या दुकानमालक भाईलाच आणखी एका भाईने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने दूरध्वनीवरून धमकावून खंडणी मागण्याचा प्रकार समोर आल्याने चर्चेत आणखी भर पडली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे भुजबळ यांच्याशी काही संबंध नसल्याचे समोर आल्याने भुजबळ यांचे स्वीय सचिव महेंद्र पवार यांनी याबाबत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, पोलिसांनी संशयित महेंद्र पाटील यास अटक केली आहे.
भाईलाच भाईने धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST