विद्युत वाहिन्यांना फांद्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:06 IST2018-06-25T00:06:15+5:302018-06-25T00:06:31+5:30
विद्युत वाहिन्यांजवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे दरवर्षी महावितरणाला करावी लागतात. त्यासाठी काही तासांसाठी विद्युत पुरवठादेखील खंडित केला जातो.

विद्युत वाहिन्यांना फांद्यांचा विळखा
नाशिक : विद्युत वाहिन्यांजवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे दरवर्षी महावितरणाला करावी लागतात. त्यासाठी काही तासांसाठी विद्युत पुरवठादेखील खंडित केला जातो. पावसाळ्यात फांद्यांमुळे विद्युत वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित होऊ नये हा त्यामागचा मूळ हेतू. मात्र प्रत्यक्षात पावसाळा सुरू होईपर्यंत महावितरणला अशा फांद्यांच्या विळख्यातील वाहिन्या मुक्त करता आलेल्या नाहीत. शहरातील अनेक भागात अजूनही झाडांजवळून वाहिन्या गेल्याचे स्पष्टपणे दिसते. काही ठिकाणी तर फांद्यांच्या मधून वाहिन्या गेल्या आहेत. यामुळे महावितरणकडून पावसाळापूर्वी मेंटेनन्सची कामे कशी केली जातात हेच उघड झाले आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली महावितरणकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. यासाठी संबंधित विभागाचा वीजपुरवठा चार तासांपेक्षा अधिक काळासाठी बंद केला जातो. पावसाळ्यापूर्वी अशाप्रकारची कामे झाली तरीही पावसाळ्यात मात्र वीज गायब होण्याचे आणि वाहिन्यांवर फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच असतात. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी सुरू झालेली महावितरणची ही दुरुस्ती मोहीम प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईपर्यंत कायम असते. शहरात मागील महिन्यापासून अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या महिन्यातही फांद्या छाटण्यासाठी वीजप्रवाह बंद करण्यात आल्याची कारणे सांगितली गेली. प्रत्यक्षात अशी कामे जर पावसाळ्यापूर्वी करावी लागत असताना प्रत्यक्षात पावसाळ्यातही वीजपुरवठा का खंडित केला जातो, असा संतप्त सवाल वीजग्राहकांचा आहे. नाशिक शहर - १ आणि २ मधील पावसाळापूर्व मेंटेनन्सची कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. शहर - १ मध्ये काही ठिकाणी महापालिकेच्या परवानगीमुळे कामे प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले.