महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन
By Admin | Updated: July 22, 2014 01:15 IST2014-07-22T01:14:27+5:302014-07-22T01:15:56+5:30
महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन

महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन
नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत़ संगणक कक्ष, ई - लर्निंग असे आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यात येत असून, शाळांचा ई - संवाद वाढविण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती महापौर अॅड़ यतिन वाघ यांनी येथे दिली़
चुंचाळे गावठाण येथील शाळा क्रमांक २८ व १०० येथे महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अॅड़ वाघ, महिंद्र अॅण्ड महिंद्रचे उपाध्यक्ष हिरामण अहेर व उपस्थितांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आले़
अॅड. वाघ म्हणाले, संगणक शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे़ यामध्ये महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल़ तसेच विद्यार्थ्यांच्या इतर विकासासाठी महापालिका शिक्षण मंडळास जास्तीत जास्त निधी दिला जाणार आहे़ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसह पालकांनीही आपली भूमिका योग्यरीत्या निभावण्याचे आवाहन त्यांनी केले़ महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर म्हणाले, गरीब व गरजू मुलांच्या विकासासाठी कंपनी सामाजिकतेच्या भावनेतून मदत करते़ संगणक कक्षाद्वारे या मुलांच्या विकासात हात लागणार असल्याचे समाधान मिळत आहे़ यावेळी उपस्थितांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले़ तसेच सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले़ याप्रसंगी महापालिकेचे उपआयुक्त बी़ टी़ गोतिसे, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुंवर, महेश चिटणीस, नगरसेवक नंदिनी जाधव, सचिन भोर, मुख्याध्यापक अर्जुन राजभोज, देवेंद्र सोनार, तुकाराम खेमनार, जयंत येवला, हेमंत पवार, संजय बोरसे, छाया जाधव, उर्मिला पवार, पुष्पा पिंगळे, मनीषा पाटील, पूजा सावंत, रोहिणी अहिरराव, खासेराव भोसले आदि उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले़ स्वागत अविनाश कोठावदे यांनी केले, तर आभार अनिल सुळ यांनी मानले़ (प्रतिनिधी)