४०० वर्षांनंतर उजळला ऐतिहासिक पार
By Admin | Updated: May 25, 2014 16:38 IST2014-05-25T16:25:55+5:302014-05-25T16:38:12+5:30
रोकडोबा पार : तब्बल अडीच वर्षे चालले बांधकाम

४०० वर्षांनंतर उजळला ऐतिहासिक पार
रोकडोबा पार : तब्बल अडीच वर्षे चालले बांधकाम
नाशिक : जुन्या नाशिकमधील अनेक घटनांसह शेकडो महापुराच्या लाटांना आपल्या भक्कम बांधकामाने अडविणारा रोकडोेबा पार तब्बल ४०० वर्षांनंतर पुन्हा उजळणार आहे. अडीच वर्षे चाललेल्या बांंधकामानंतर या पाराला गतवैभव प्राप्त झाले असून, आगामी शेकडो वर्षे पाराचा इतिहास जनतेसमोर ठेवण्यास हा पार आता सज्ज झाला आहे.
परंपरा आणि संस्कृतीची जोपासना करणार्या जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात केवळ विविध व्यक्तीच परंपरा जपतात असे नाही तर तेथील वास्तुही त्याचा श्रीमंत इतिहास गौरवाने अंगाखांद्यावर मिरवत असतात. अशा अनेक वास्तू आज या भागांमध्ये आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यातील काही वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत, तर काही वास्तूंना जागरूक लोकप्रतिनिधींमुळे पुनर्वैभव मिळते आहे. जुन्या नाशकातील पार संस्कृती अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली वास्तू. गावपातळीवर कोणताही निर्णय घ्यायचा अथवा काही घोषणा करायची तर या पारांवरूनच केली जात. त्यामुळे तत्कालीन आबालवृद्धांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि गावातील महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणून या पारांकडे पाहिले जात असे.
जुन्या नाशकात नेहरू चौकातील पिंपळपार आणि मोदकेश्वर मंदिरालगत असलेला रोकडोबा पार हे पार ऐतिहासिक समजले जातात. पिंपळपारावर झालेल्या स्वातंत्र्याच्या आणि राजकीय सभांची चर्चा आजही या पारांकडे पाहून झडत असते. गोदाकाठी मोदकेश्वर मंदिराजवळ असलेल्या रोकडोबा पाराचा इतिहासही असाच पुरातन आहे. गजानन महाराज, साईबाबा, गोपालदास महाराज, संत गाडगे महाराज अशा अनेक थोर संतांचे या पारावर वास्तव्य असायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तर रोकडोबा यात्रेत कीर्तन होत असे. त्यावेळी नजीकच्या मरीआई मंदिराजवळ विशाल वटवृक्षाखाली कुस्तीच्या दंगली होत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या पारासमोर उभे राहून भाषण केल्याचे दाखले आजही दिले जातात. टाकळीत चौदा वर्षे तपश्चर्या करणारे समर्थ रामदासस्वामी रोकडोबा पारावरील गणेशाचे आवर्जुन दर्शन घ्यायचे, अशा या ऐतिहासिक पाराला गतवैभव देण्याचे काम नगरसेवक शाहू खैरे यांनी केले आहे. सकाळी प्रधान संकल्प, शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर देवतांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी कलशारोहण त्र्यंबक आखाडा परिसराचे सागरानंद सरस्वती, संत फलाहारीबाबा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचे पौरोहित्य अविनाश देव, दिनेश देव, अतुल गायधनी, रत्नाकर गायधनी यांनी केले.
पाराचे स्वरूप
सुमारे २० मीटर लांब आणि रुंद असलेल्या या चौकोनी पाराचे बांधकाम काळ्या पाषाणात झाले होते. त्याची निर्मिती किती जुनी आहे याबाबत स्पष्ट उल्लेख आढळत नाही. त्या पारावर मध्यभागी वड आणि पिंपळ असा एकत्र भव्य वृक्ष असून, त्याखाली सत्यविनायक गणेशाचे मंदिर आहे. बाजूला पिंपळाचे मोठे झाड असून, त्याखाली शंकराची पिंड आणि देवीचे मंदिरही आहे. अनेक पुरांच्या लाटांना झेलणार्या या पाराचा वापर पुराचा अंदाज लावण्यासाठीही होत असे. आजही वटपौर्णिमेला येथे जुन्या नाशकातील महिला मोठ्या प्रमाणात येत असतात. अशा या पाराला आता नवसंजीवनी मिळाली असून, आकर्षक बांधकामामुळे तो उजळला आहे. पिंपळपार उजळल्यानंतर १५ वर्षांनी या पाराचे भाग्य उजळले असून, त्याच्या नूतनीकरणातून इतिहासालाच उजाळा मिळाला आहे.
आकर्षक बांधकाम
सुमारे अडीच वर्षे चाललेल्या या बांधकामात नेवासा येथून आणलेला ८ आणि १० फुटी दगड वापरला गेला आहे. राममंदिरासह अनेक मंदिरांचे बांधकाम केलेल्या मध्य प्रदेश येथील मुकेश शर्मा यांनी या पाराची सजावट केली आहे. त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च आला असून, एकप्रकारे इतिहास जिवंत ठेवण्याचेच काम त्यातून झाले आहे. प्राणप्रतिष्ठा, होमहवन आणि कलशपूजन असे कार्यक्रम त्यात ठेवण्यात आले आहेत.
- नगरसेवक शाहू खैरे